"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:45 IST2025-10-12T17:43:56+5:302025-10-12T17:45:31+5:30
Tariffs on China by Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के टॅरिफ आकारण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून चीनने संताप व्यक्त केला.

"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
Tariffs on China by US Latest Update: चीनमधून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवर शंभर टक्के टॅरिफ लागू करणार असल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जागतिक व्यापारात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी १०० टक्के टॅरिफ लागू करण्याची धमकी दिल्यानंतर चीनने संताप व्यक्त केला. चीनबद्दल अमेरिकेची भूमिका दुटप्पी असून आम्ही व्यापार युद्धाला घाबरत नाही. आम्हीही याला उत्तर म्हणून पावले टाकू, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल सुनावले. ते म्हणाले अमेरिकेकडून जे विधान केले गेले आहे, ते अमेरिकेच्या दुटप्पी भूमिकेचे उत्तम उदाहरण आहे.
ट्रम्प यांनी केलेली घोषणा अमेरिकेच्या प्रशासनाकडून लागू करण्यात आली, तर चीनही प्रत्युत्तर म्हणून पावले टाकेल. चीन संभाव्य व्यापार युद्धाला घाबरत नाही आणि आपल्या कायदेशीर अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करेल, असेही चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आपल्याने निवेदनात म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (१० ऑक्टोबर) चीनवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लागू करणार असल्याचे विधान केले होते. दुर्मिळ खनिज निर्यातीवर चीनकडून कठोर बंधने लादण्यात आल्याच्या मुद्द्यावर टीका करत ट्रम्प यांनी ही धमकी दिली होती.
जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीला न जाण्याचा इशारा
चीन शत्रूसारखं वागवत असून, जगाला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. चीनने दुर्मिळ खनिज निर्यातीबद्दलचे धोरण मागे घेतले नाही, तर या महिन्याच्या अखेरीस होत असलेल्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीला जाणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांच्याकडून १०० टक्के टॅरिफ लावण्याची देण्यात आलेली धमकी आणि चीनने जशास तसे उत्तर दिले जाण्याची घेतलेली भूमिका यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता वाढली आहे.