अमेरिकेने बनवले स्वत:चे ‘सर्च इंजिन’
By Admin | Updated: August 27, 2014 00:55 IST2014-08-27T00:55:55+5:302014-08-27T00:55:55+5:30
इंटरनेट चॅटसह अब्जावधी कम्युनिकेशन रेकॉर्डमधील (संपर्क नोंदी) माहिती शोधण्यासाठी अमेरिकेच्या एका प्रमुख गुप्तचर संघटनेने ‘गुगल’ सारखे स्वत:चे गोपनीय सर्च इंजिन तयार केल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेने बनवले स्वत:चे ‘सर्च इंजिन’
वॉशिंग्टन : फोन कॉल्स, ई-मेल, इंटरनेट चॅटसह अब्जावधी कम्युनिकेशन रेकॉर्डमधील (संपर्क नोंदी) माहिती शोधण्यासाठी अमेरिकेच्या एका प्रमुख गुप्तचर संघटनेने ‘गुगल’ सारखे स्वत:चे गोपनीय सर्च इंजिन तयार केल्याचे वृत्त आहे.
नव्याने सुरू झालेल्या ‘द इंटरसेप्ट’ या वेबसाईटने व्हीसलब्लोअर एडवर्ड स्नोडेन यांनी फोडलेल्या गोपनीय अहवालाच्या आधारे हे वृत्त दिले आहे. दोन अमेरिकी संघटना या इंजिनच्या माध्यमातून ८५० अब्ज कम्युनिकेशन रेकॉर्डचे विश्लेषण करणार आहेत.
नॅशनल सेक्युरिटी एजन्सीचे अलीकडेच निवृत्त झालेले संचालक जनरल कीथ अलेक्झांडर यांच्या संकल्पनेतून हे सर्च इंजिन साकारले असून त्याला ‘आयसीरीच’ असे नाव देण्यात आले आहे.
अमेरिकी गुप्तचर नोंदींच्या अंतर्गत देवाणघेवाणीच्या सर्वात मोठ्या सुविधेच्या रूपाने या इंजिनची रचना करण्यात आलेली आहे. हे इंजिन दररोज दोन अब्ज ते पाच अब्ज नव्या नोंदींचा निपटारा करू शकते. (वृत्तसंस्था)