अमेरिकन शोध शोध शोधतायत! मिलिट्री नेटवर्कमध्ये चिनी व्हायरस घुसला; व्हाईट हाऊसमध्ये बैठकांवर बैठका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 14:07 IST2023-07-30T14:07:31+5:302023-07-30T14:07:49+5:30
America vs China Cold War: अमेरिकी सरकारची झोप उडाली आहे. अमेरिकेला हादरवणारी एक बातमी येत आहे.

अमेरिकन शोध शोध शोधतायत! मिलिट्री नेटवर्कमध्ये चिनी व्हायरस घुसला; व्हाईट हाऊसमध्ये बैठकांवर बैठका
अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढू लागला आहे. काहीजण युद्धसदृष्य परिस्थिती असल्याचा दावा करत आहेत. दोन्ही देश एकमेकांना हवेत आणि समुद्रात घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच अमेरिकेला हादरवणारी एक बातमी येत आहे. अमेरिकन मिलिट्रीच्या नेटवर्कमध्ये चिनी व्हायरस घुसला आहे. यामुळे ऐन युद्धावेळी अमेरिकन सैन्याचे कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चीनने अमेरिकन सैन्याच्या पॉवर ग्रीड, दळणवळण यंत्रणा आणि पाणीपुरवठा नेटवर्कमध्ये व्हायरस सोडला असल्याने अमेरिकी सरकारची झोप उडाली आहे. चीनचा हा कोड केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरातील त्यांच्या लष्करी तळांच्या नेटवर्कमध्ये असू शकतो, अशी भीती बायडेन सरकारला वाटू लागली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लष्कराच्या नेटवर्कमध्ये चीनचा कोड असणे हे टाइमबॉम्बसारखे आहे. यामुळे केवळ लष्कराच्या ऑपरेशनवरच परिणाम होणार नाही, तर लष्कराच्या पायाभूत सुविधांशी जोडलेली घरे आणि व्यवसायांवरही याचा परिणाम होईल, असे अमेरिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
याबाबत माहिती मिळाल्यावर अमेरिकेत युद्धसदृष्य स्थिती आहे. व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी या बैठकांना हजर राहत आहेत. सरकार अमेरिकेतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा रेल्वे, जलव्यवस्था, विमान वाहतूक न थांबता वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे नुकतेच नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते अॅडम हॉज यांनी चीनचे नाव न घेता म्हटले होते.
सायबर हल्ल्याचा आरोप चीनवर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारतातील सायबर हल्ल्याबाबत अनेक वेळा चीनवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.