America President Donald Trump News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जाते. यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आणि त्याने भारताच्या पश्चिम भागातील राज्यांमध्ये ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली. भारताने पाकिस्तानचा एकही डाव यशस्वी होऊ दिला नाही. अशातच अमेरिकेने हस्तक्षेप करून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम घडवून आणला. आम्ही अण्वस्रांचे युद्ध रोखले, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तुम्हाला सांगताना खूप अभिमान वाटतो की, भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व अढळ आणि शक्तिशाली होते. परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ताकद, बुद्धिमत्ता आणि संयम यांच्या दृष्टिकोनातून ते खरोखरच अढळ होते. आम्ही खूप मदत केली. व्यवसायातही मदत केली, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
युद्धविराम केला नाही, तर व्यापार करणार नाही
पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही तुझ्यासोबत मोठ्या प्रमाणावर व्यापार करू. परंतु, हे थांबायला हवे. जर तुम्ही ते थांबवले तर आम्ही व्यापार करू. जर तुम्ही हे थांबवले नाही तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही. माझ्यासारखा व्यवसाय कधीही अन्य लोकांनी केला नाही. अचानक त्यांनी मला सांगितले की, आम्हाला थांबायला हवे आणि त्यांनी तसे केले, हे मी तुम्हाला सांगू शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
दरम्यान, भारताने युद्धविराम मान्य केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा केली. असे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी याचे उत्तर दिले. त्यांनी एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तीन डझन देश यासाठी सक्रिय होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच युद्धविराम शक्य झाला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख करून डार यांनी सर्वांचे आभार मानले. भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. भारत चर्चेला तयार नव्हता, मग पाकिस्तानला इतर देशांकडे विनवणी करावी लागली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. तोपर्यंत भारताने यावर सहमती दर्शविली नव्हती. ट्रम्प यांच्या पोस्टमुळेच १७ दिवसांपासून सुरू असलेला तणाव परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या ६० सेकंदांच्या पत्रकार परिषदेने निवळला.