अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:13 IST2025-10-27T18:12:48+5:302025-10-27T18:13:12+5:30
US Plane Crash In South China Sea: दक्षिण चीन समुद्रामध्ये अवघ्या ३० मिनिटांच्या अंतराने अमेरिकन नौदलाचं एक एमएच-६० सीहॉक हेलिकॉप्टर आणि एक एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट विमान कोसळल्याने खळबळ उडाली आहे.

अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
दक्षिण चीन समुद्रामध्ये अवघ्या ३० मिनिटांच्या अंतराने अमेरिकन नौदलाचं एक एमएच-६० सीहॉक हेलिकॉप्टर आणि एक एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट विमान कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघाताच्या वृत्ताला अमेरिकन नौदलाने दुजोरा दिला आहे. मात्र वादग्रस्त अशा दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेची विमानं काय करत होती याची माहिती मात्र समोर आलेली नाही. मात्र ही विमानं सरावादरम्यान, दुर्घटनाग्रस्त झाल्याचे चीननच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या अपघातानंतर आम्ही अमेरिकेला मदत करण्यास तयार आहोत. तर अमेरिकेच्या पॅसिफिक महासागरातील ताफ्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एमएच-६० आर सीहॉक हेलिकॉप्टर नियमित सरावासाठी यूएसएस निमित्झवरून रवाना झाल्यावर दुपारी २.४५ च्या सुमारास अपघातग्रस्त झालं. या हेलिकॉप्टरमध्ये चालकदलाचे तीन सदस्य होते. त्यांना शोधमोहीम राबवून वाचवण्यात आले.
या अपघातानंतर सुमारे ३० मिनिटांनी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी स्ट्राइक फायटर स्क्वाड्रन २२ ज्याला फायटिंग रेडकॉक्स नावाने ओळखले जाते त्यातील एक एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट विमान यूएसएस निमित्झवरून रवाना झाल्यावर दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानातील दोन्ही चालकांनी इजेक्ट केल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर बचाव पथकाने त्यांना शोधून वाचवले.