शीख सैनिकांनी दाढी न ठेवण्याबाबत पुनर्विचार करा; अमेरिकी काँग्रेस सदस्याची पेंटॅगॉनकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 07:23 IST2025-10-24T07:22:00+5:302025-10-24T07:23:08+5:30
या धर्माच्या अनुयायांनी केस न कापणे व दाढी ठेवणे हे आवश्यक आहे. ती त्यांची धार्मिक प्रथा आहे.

शीख सैनिकांनी दाढी न ठेवण्याबाबत पुनर्विचार करा; अमेरिकी काँग्रेस सदस्याची पेंटॅगॉनकडे मागणी
न्यूयॉर्क : लष्करात सेवेत असलेल्या शिखांनी दाढी ठेवू नये या धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी अमेरिकी काँग्रेसचे सदस्य थॉमस आर. स्वोझी यांनी अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय पेंटॅगॉनकडे केली आहे. शीख धर्मात न कापलेले केस आणि दाढी ठेवणे, हे त्यांचा श्रद्धेचे आणि समतेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वोझी यांनी संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिखांनी अनेक वर्षे अमेरिकन सैन्यात उत्तम कामगिरी बजावली आहे. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धातही त्यांनी शौर्य गाजविले होते. शिखांसाठी देशसेवा हे पवित्र कर्तव्य आहे. या धर्माच्या अनुयायांनी केस न कापणे व दाढी ठेवणे हे आवश्यक आहे. ती त्यांची धार्मिक प्रथा आहे.
सैन्याची व्यावसायिकता महत्त्वाची असली तरी सैनिकांच्या धार्मिक गोष्टी व वैद्यकीय सुविधा यांच्याकडे अमेरिकी सरकारने दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. दाढी ठेवण्यास बंदी केल्याचा आदेश न पाळणारे सैनिक सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनेक सवलतींपासून वंचित राहतील, अशी भीतीही स्वोझी यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, सैनिकांनी दाढी राखणे अयोग्य आहे. त्यांना लष्करी मापदंडांचे पालन करावेच लागेल. त्यांच्या या आदेशामुळे अमेरिकी लष्करातील सैनिक नाराज झाले आहेत.