America vs Ukraine : काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांचा बैठकीत वाद झाला. या बैठकीनंतर अमेरिकेने युक्रेनला पुरवली जाणारी लष्करी मदत रोखली. तसेच, आता एक मोठी माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वोल्डोमीर झेलेन्स्की यांना युक्रेनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याची योजना आखली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना सूचना केली असून, अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे चार अधिकारी बुधवारी युक्रेनला पोहोचले आणि युक्रेनमधील विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. युक्रेनमध्ये लवकरच अध्यक्षपदाच्या निवडणुका व्हाव्यात हा या बैठकीचा उद्देश होता.
रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वरिष्ठ सहाय्यकांनी युक्रेनच्या विरोधी पक्षनेत्या युलिया टिमोशेन्को आणि पेट्रो पोरोशेन्को यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. ट्रम्प अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या नेत्यांना विचारले की, युक्रेनमध्ये निवडणुका कधी व्हाव्यात आणि त्यासाठी काय करावे लागेल?
दरम्यान, युक्रेनने अलीकडेच पोरोशेन्को यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. पोरोशेन्को हे यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. झेलेन्स्की यांनी निवडणुकीत पोरोशेन्को यांचा पराभव केला होता. अहवालानुसार, ट्रम्प यांच्या मित्रपक्षांचे असे मत आहे की, युक्रेनमध्ये लवकरच निवडणुका झाल्या तर झेलेन्स्की यांना युद्ध गुन्हेगार म्हणून नुकसान सहन करावे लागू शकते.
युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागूयुद्धामुळे युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू आहे. शांतता करार होईपर्यंत आणि युक्रेन पुन्हा रुळावर येईपर्यंत येथे निवडणुका होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. झेलेन्स्की म्हणतात की, मतदान केलेल्या बहुतेक लोकांनी एकतर इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे किंवा युद्धात तैनात आहेत. अशा परिस्थितीत शांततेशिवाय निवडणुका कशा होणार? युक्रेनमध्ये 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि झेलेन्स्की यांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपला. पण, युद्धामुळे अद्याप निवडणुका घेण्यात आल्या नाही.