Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जगभरातील बहुतांश देशांनी निषेध केला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लगेचच भारताने पाकविरोधात कठोर निर्णय घेतले. यावर पाकचा चांगलाच तिळपापड झाला. सिंधू करारानुसार मिळणारे पाणी अन्यत्र वळविण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न हा युद्धसदृश कृती मानला जाईल, असा कांगावा करत, पाकिस्तानने भारताशी व्यापार, सिमला करारासह अन्य द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे. यानंतर आता जगातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला असून, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनेही दहशतवाद्यांविरोधातील कारवाईसाठी भारताला भक्कम समर्थन दिल्याचे सांगितले जात आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तीव्र निषेध केला. या दोन नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. कतार, जॉर्डन, इराक आणि अरब देशांच्या राजदूतांनी तीव्र निषेध केला आहे. यातच आता ट्रम्प प्रशासनातील राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत भारताच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे म्हटले आहे.
आम्ही भारतासोबत एकजुटीने उभे आहोत
पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करून मारण्यात आलेल्या भयानक इस्लामी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतासोबत एकजुटीने उभे आहोत. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले त्यांच्यासोबत माझ्या प्रार्थना आणि सहानुभूती आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांसोबत आम्ही आहोत. या भयानक हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांचा शोध घेऊन दहशतवाद्यांना बिमोड करण्यासंदर्भात आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला पाठिंबा देतो, अशी ग्वाही तुलसी गबार्ड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून दिली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हल्ल्याच्या निषेध करत दहशतवादविरोधी लढ्यात भारतासोबत असल्याचे म्हटले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता टॅमी ब्रूस यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी थेट उत्तर देणे टाळल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. खूप वेगाने परिस्थिती बदलत आहेत आणि आम्ही जवळून सगळ्या घडामोडींकडे बघत आहोत, असे त्या म्हणाल्या.