काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या आगीने कहर केला होता. हजारो घरे आगीच्या भक्षस्थानी पडली होती. अगदी हॉलिवूड, अब्जाधीशांची घरे देखील या आगीत सुटली नव्हती. यातून अमेरिका सावरत नाही तोच पावसाने थैमान घातले आहे. टेक्सासमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पुरात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.
टेक्सासमध्ये लहान मुली उन्हाळी कॅम्पिंगसाठी गेल्या होत्या. त्या देखील बेपत्ता आहेत. लोकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता आहे.
केर काउंटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प मिस्टिक आणि इतर अनेक उन्हाळी शिबिरे असलेल्या केर काउंटीमध्ये हा पूर आला आहे. या भागात २८ मुलांसह ८४ लोकांचे मृतदेह सापडले आहेत. मध्य टेक्सासमध्ये आतापर्यंत मृतांची संख्या किमान १०४ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट स्थानिक आणि संघीय हवामान सेवांनी पूर येण्यापूर्वी केर काउंटीला पुराचा इशारा दिला होता असे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आठवड्याच्या अखेरीस टेक्सासमधील पूरग्रस्त भागाला भेट देतील, असे त्या म्हणाल्या.
४५ मिनिटांत २६ फूट पाण्याची उंची वाढली...
शुक्रवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे, ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या ४५ मिनिटांत २६ फूट (सुमारे ८ मीटर) वाढली होती. यामुळे अचानक पाण्याचा लोंढा परिसरात घुसला. यामुळे कॅम्पिंगसाठी राहत असलेल्या भागात पाणी भरले आणि यात मुलांचा बुडून मृत्यू झाला.