उद्या मोठी घडामोड घडणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ, काय करणार..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:47 IST2025-03-03T20:44:08+5:302025-03-03T20:47:47+5:30
America-Russia-Ukraiane : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने विविध चर्चांना उधाण आले आहे.

उद्या मोठी घडामोड घडणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ, काय करणार..?
America-Russia-Ukraiane : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यातील वाद सर्व जगाने पाहिला. व्हाईट हाउसमध्ये या दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये जोरदार तुतू-मैमै झाली. या वादानंतर दोन गट तयार झाले असून, एक झेलेन्स्कींना तर दुसरा ट्रम्प यांना पाठिंबा देत आहे. आंतरराष्ट्रीय मीडियासमोर झालेल्या या वादाचे जगावर तीव्र पडसाद उमटणार असल्याची चर्चाही सध्या सुरू आहे. अशातच, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणतात, 'उद्याची रात्र खूप मोठी असणार आहे. काय होईल, ते मी तुम्हाला सांगेन.' या पोस्टनंतर जगभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा बदला घेण्याची तयारी केली आहे की, पुतिन यांच्याशी भेट घेऊन नवीन काही योजना आखणार आहेत? अशाप्रकारचे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
विशेष म्हणजे, या पोस्टच्या तासाभरापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनसंदर्भात आणखी एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणातात, 'रशियाला युक्रेनची जमीन न देणारे एकमेव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. लक्षात ठेवा की, जेव्हा कमकुवत आणि कुचकामी डेमोक्रॅट टीका करतात, तेव्हा फेक न्यूज पसरवली जाते,' अशा प्रकारची पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टचे विविध अर्थ लावले जात आहेत.
बैठकीत ट्रम्प-झेलेन्स्की वाद
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ओव्हल ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी महत्वाची बैठक झाली. या बैठकीत दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. झेलेन्स्कीने 'मिनरल्स' करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, त्यामुळे हे सर्व वाद झाल्याचे बोलले जात आहे. या वादानंतर अनेक देश झेलेन्स्कींच्या समर्थनार्थ पुढे आले.