America Protest: 'काम बंद, शाळा बंद, खरेदी बंद'चा नारा', अमेरिकेत देशव्यापी संप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 14:37 IST2026-02-01T14:35:22+5:302026-02-01T14:37:22+5:30
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक कडक धोरणांविरोधात आंदोलनाचे आवाहन

America Protest: 'काम बंद, शाळा बंद, खरेदी बंद'चा नारा', अमेरिकेत देशव्यापी संप
स्थलांतरविषयक कडक धोरणे, स्थलांतर व सीमा शुल्क अंमलबजावणी संस्थेच्या कारवाया आणि त्यातून झालेल्या नागरिकांच्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत शुक्रवारी 'काम बंद, शाळा बंद, खरेदी बंद' या घोषणेखाली देशव्यापी संप व आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनानुसार मिनियापोलिस व त्याचा परिसर, लॉस एंजेलिस, डेट्रॉइट उपनगरातील बर्मिंगहॅम, जॉर्जिया राज्यातील सुवानी, न्यूयॉर्क शहर, मेन राज्यातील पोर्टलैंड, तसेच अॅरिझोना, कोलोरेंडो आणि मिशिगनसह इतर अनेक राज्यांमध्ये आंदोलन, निदर्शने, वर्गबहिष्कार आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे प्रकार पाहायला मिळाले. काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या, तर काही शहरांमध्ये फेडरल कार्यालये, सिटी हॉल, चर्च आणि व्यापारी केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र आले होते.
निदर्शकांच्या मृत्यूनंतर आंदोलने अधिक तीव्र
ही आंदोलने मिनियापोलिस येथे स्थलांतर कारवाईचे चित्रीकरण करत असताना गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या अतिदक्षता विभागातील परिचारक अॅलेक्स प्रेट्टी, तसेच याआधी स्थलांतर अंमलबजावणी अधिकाऱ्याच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या रेनी गुड यांच्या प्रकरणानंतर तीव्र झाली.
काही राज्यांत शाळा बंद; विविध ठिकाणी निदर्शने
- अॅरिझोना, कोलोरेंडो आणि इतर काही राज्यांतील शाळांनी आधीच वर्ग रद्द केले. देशभरातील अनेक शहर केंद्रे, राज्य विधान भवन परिसर व चर्चजवळ विद्यार्थी व नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे नियोजन केले.
- मिनियापोलिसच्या बाहेरील भागात, बिशप हेन्री व्हिपल फेडरल इमारतीसमोर शुक्रवारी पहाटे कडाक्याच्या थंडीत शेकडो आंदोलक जमले होते. धर्मगुरूंच्या भाषणांनंतर आंदोलकांनी मोर्चा काढत गृहसुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना नोकऱ्या सोडा, मिनेसोटातून बाहेर पडा, घोषणा दिल्या.
- मिशिगनव्या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी वर्गातून बाहेर पडत आंदोलन केले. उणे १८ अंश सेल्सिअस तापमानात ते दीड कि.मी. चालत व्यापारी भागात पोहोचले.