कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 08:39 IST2025-08-31T08:38:51+5:302025-08-31T08:39:43+5:30

Melania Trump Nobel Peace Prize nomination : रिपब्लिकनचे प्रतिनिधी अँना पॉलिना लुना यांनी केला असा दावा

america president donald trump wife melania trump may get nomination for nobel peace prize | कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?

कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?

Melania Trump Nobel Peace Prize nomination : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी चर्चा सुरू आहे. भारत-पाकिस्तान तणाव असो किंवा रशिया-युक्रेन युद्ध असो, ट्रम्प अशा वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसले. यामागे ट्रम्प यांची शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची इच्छा असल्याचे जाणकारांचे मत आहे. काही देशांनी ट्रम्प यांना नामांकितदेखील केले आहे. पण तशातच आता 'कहानी में ट्विस्ट' आला आहे.

फ्लोरिडा रिपब्लिकनचे प्रतिनिधी अँना पॉलिना लुना यांनी असा दावा केला आहे की युक्रेन युद्धाशी संबंधित शांतता प्रयत्नांच्या भूमिकेसाठी अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांना २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले जाऊ शकते. लुना यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. त्यांनी म्हटले की रशिया आणि युक्रेनमधील संभाव्य शांतता प्रगतीमागे मेलानिया या एक प्रमुख कारण असू शकतात. लुना म्हणतात की मेलानिया ट्रम्प यांनी रशियासोबतच्या अमेरिकेच्या संवादात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युक्रेन संघर्षाशी संबंधित अमेरिकेच्या मध्यस्थी प्रयत्नांमध्ये मेलानिया आणखीही सहभागी होऊ शकतात असे त्यांनी संकेतही दिले आहेत. त्यामुळे त्यांचे नावदेखील पुढे केले जाऊ शकते.

मेलानिया यांनी पुतिन यांना लिहिलं होतं पत्र

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अलास्कामध्ये युक्रेन युद्धावर केंद्रित झालेल्या शिखर परिषदेदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानिया यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना लिहिलेले पत्र सुपूर्द केले होते. मेलानियाच्या कार्यालयाने नंतर हे पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी युद्धामुळे प्रभावित झालेल्या मुलांचे संरक्षण करण्याचे पुतिन यांना आवाहन केले होते. हा संदेश मुख्यत्वे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत आणि प्रगतीबाबत केंद्रित होता. परंतु वृत्तसंस्थांनी अप्रत्यक्षपणे हजारो युक्रेनियन मुलांचा उल्लेख केला, ज्यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाला नेण्यात आल्याचे वृत्त आहे.

अलास्का शिखर परिषदेत ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील चर्चेला फारसे यश आले नाही. रशियन सैन्याने युक्रेनियन शहरांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. बीबीसीच्या मते, गुरुवारी कीवमध्ये रशियन गोळीबारात २३ लोक मारले गेले, ज्यात चार मुलेही होती.

'या' देशांनी ट्रम्प यांना नामांकित केले आहे

दरम्यान, आतापर्यंत अनेक देशांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकित केले आहे. त्यात रवांडा, इस्रायल, गॅबॉन, अझरबैजान आणि कंबोडिया यांचा समावेश आहे. याशिवाय, काही व्यक्तींनी ट्रम्प यांना खाजगीरित्या देखील नामांकित केले आहे. अधिकृत नियमांनुसार, हा पुरस्कार तीन व्यक्ती किंवा संघटनांमध्ये वाटला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, नोबेल समिती १० ऑक्टोबर २०२५ रोजी नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची घोषणा करणार आहे.

Web Title: america president donald trump wife melania trump may get nomination for nobel peace prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.