Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:08 IST2025-12-18T12:08:28+5:302025-12-18T12:08:59+5:30
ट्रम्प म्हणाले, टॅरिफ हे केवळ अमेरिकेची शक्तीच दर्शवणारेच नाही, तर जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरले आहे...

Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत. देशाला संबोधित करताना, आपल्या निर्णयामुळे आणि धोरणांमुळे जगातील अनेक मोठे संघर्ष संपुष्टात आल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. आपण केवळ दहा महिन्यांतच आठ युद्धे संपवली, या यशामागे 'टॅरिफ' (आयात शुल्क) धोरण हीच सर्वात मोठी ताकद होती, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
"टॅरिफ हा शब्द मला सर्वाधिक प्रिय आहे" -
ट्रम्प म्हणाले, टॅरिफ हे केवळ अमेरिकेची शक्तीच दर्शवणारेच नाही, तर जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरले आहे. "टॅरिफ हा शब्द मला सर्वाधिक प्रिय आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या व्यापार धोरणाचे जोरदार समर्थन केले. यामुळे अमेरिकन उद्योगांना संरक्षण मिळाले आणि महसुलात मोठी वाढ झाली, असा दावा त्यांनी केला आहे. तत्पूर्वी, ट्रम्प प्रशासनाने भारतासह, कॅनडा, मेक्सिको आणि ब्राझील यांसारख्या देशांवर टॅरिफ लागू केला आहे.
आपल्या २०२६ च्या अजेंड्यासंदर्बातील भाषणात बोलताना ट्रम्प म्हणाले, "आपल्या प्रयत्नांमुळे इराणचा अणू धोका संपुष्टात आला, गाझा येथील दीर्घकालीन संघर्षात शांतता प्रस्थापित झाली, ओलिसांची जिवंत किंवा मृत स्वरूपात सुटका करणे आपल्या धोरणांमुळे शक्य झाले." मात्र, ट्रम्प यांचे हे दावे अतिशयोक्ती आहेत, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
बायडेन सरकारवर टीक -
या आपल्या संबोधनात डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढती महागाई आणि सामानाच्या किमती यांवर फारसे भाष्य न करता, ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कर कपातीचे जोरदार समर्थन केले. याच वेळी, त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. देशातील सद्यस्थिती, महागाई आणि इमिग्रेशन (Immigration) आदी समस्यांना गत सरकारच जबाबदार असून, आपण आता परिस्थिती सुधारण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले.