America on BRICS: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांविरोधात गरळ ओकली अन् या देशांना 'पिशाच्च' म्हटले. ही संघटना जास्त काळ टिकणार नाही, कारण हे देश एकमेकांचा द्वेष करतात, असेही ते म्हणाले. तसेच, अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्काबाबत नवारो म्हणतात, भारताला अमेरिकेसोबत व्यापार चर्चेा करावीच लागेल. असे झाले नाही, तर ते हे त्यांच्यासाठी चांगले ठरणार नाही.
पीटीआयच्या वृत्तानुसार, सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) 'रिअल अमेरिकाज व्हॉइस' कार्यक्रमात बोलताना पीटर नवारो म्हणाले, 'खरं म्हणजे या गटातील कोणताही देश अमेरिकेला आपला माल विकल्याशिवाय टिकू शकत नाही. जेव्हा ते अमेरिकेला निर्यात करतात, तेव्हा ते व्यापार धोरणांमुळे पिशाच्चांसारखे अमेरिकेच्या नसांमधून रक्त शोषतात.'
'चीनने पाकिस्तानला अणुबॉम्ब दिला'
नवारो पुढे म्हणतात, 'ब्रिक्स युती कशी एकजूट राहू शकते, हे मला समजत नाही. ऐतिहासिकदृष्ट्या त्या सर्वांनी एकमेकांचा द्वेष केला आहे आणि एकमेकांना मारले आहे.' भारतावर टीका करताना नवारो म्हणाले, 'भारत चीनशी अनेक दशकांपासून युद्ध करत आहे. मला आता आठवले की, चीनने पाकिस्तानला अणुबॉम्ब दिला होता. आता तुमच्याकडे हिंद महासागरात चिनी झेंडे घेऊन विमाने उडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही हे कसे हाताळता ते पाहू,' अशी टीकाही त्यांनी केली.
भारताच्या टॅरिफवर नवारो म्हणाले...
नवारो यांनी इशारा दिला की, 'भारताला कधीतरी अमेरिकेशी व्यापार चर्चेवर सहमती दर्शवावी लागेल. जर असे झाले नाही, तर भारत रशिया आणि चीनसोबत उभा असल्याचे दिसून येईल आणि हे भारतासाठी चांगले ठरणार नाही. भारताला टॅरिफचा महाराजा म्हटल्याने भारत सरकार दुखावले आहे, परंतु ते पूर्णपणे खरे आहे. जगातील कोणत्याही मोठ्या देशांपेक्षा भारत अमेरिकेविरुद्ध सर्वाधिक टॅरिफ लादतो,' असा दावाही त्यांनी केला.
नवारो यांनी असाही दावा केला की, 'रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी भारताने कधीही रशियाकडून तेल खरेदी केले नव्हते. मात्र, युद्धानंतर भारताने नफेखोरीचा दृष्टिकोन स्वीकारला. रशिया पूर्णपणे चीनशी जोडला गेला आहे. बीजिंगची नजर व्लादिवोस्तोक या रशियन बंदरावर आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्थलांतराद्वारे चीनने आधीच रशियाचा सर्वात मोठा प्रदेश असलेल्या सायबेरियावर वसाहत केली आहे. चीन हे सर्व करत आहे याबद्दल पुतिन यांना शुभेच्छा.'