अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 19:53 IST2025-09-14T19:52:41+5:302025-09-14T19:53:07+5:30

America News : टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

America News: Ban on 'Sharia law' in the US state of Texas; Muslim organizations protest | अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश

अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश

America News : अमेरिकेतील टेक्सास राज्याने शरिया कायद्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे मुस्लिम संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी जाहीर केले की, त्यांच्या राज्यात इस्लामिक शरिया कायदा लागू करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, त्यांनी रहिवाशांना आवाहन केले की, जर कोणी व्यक्ती किंवा संस्था शरिया कायद्याचे पालन करण्यास दबाव टाकत असेल, तर त्याबाबतची माहिती स्थानिक पोलिस किंवा टेक्सास डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीला द्यावी.

शरिया समर्थक मूर्खांना घाबरण्याची गरज नाही

गव्हर्नर एबॉट यांचे हे वक्तव्य ह्यूस्टनमध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर आले. त्या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम मौलवी लाउडस्पीकरवर दुकानदारांना दारू, डुकराचे मांस आणि लॉटरी तिकीट न विकण्याचे आवाहन करताना दिसतो. एबॉट यांनी या घटनेला "छळ" असे संबोधले आणि स्पष्ट केले की, टेक्सासमध्ये कोणताही धार्मिक कायदा लोकांच्या सार्वजनिक जीवनावर लादण्याचा प्रयत्न केला, तर तो सहन केला जाणार नाही. त्यांनी असेही म्हटले, “मी असे कायदे साइन केले आहेत, जे टेक्सासमध्ये शरिया कायद्याला बंदी घालतात. कोणत्याही व्यवसायाला किंवा व्यक्तीला अशा मूर्खांना घाबरण्याची गरज नाही.”

टेक्सासमध्ये शरिया कायद्याची काय परिस्थिती आहे?

टेक्सासमध्ये स्वतंत्र असा "शरिया कायदा" नाही. मात्र, 2017 मध्ये पास झालेला ‘American Laws for American Courts’ हा कायदा स्पष्ट करतो की, अमेरिकन न्यायालये कोणतेही परकीय किंवा धार्मिक कायदे (ज्यात शरिया समाविष्ट आहे) लागू करू शकत नाहीत, जर ते अमेरिकन कायद्याशी विसंगत असतील.

मुस्लिम संघटनांचा आक्रोश

Council on American-Islamic Relations (CAIR) यांसारख्या मुस्लिम हक्क संघटनांनी एबॉट यांची विधाने दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले. त्यांचे म्हणणे आहे की, शरिया कायदा केवळ वैयक्तिक धार्मिक आचरणाशी संबंधित असतो, नागरी कायद्याशी नाही. याआधी या वर्षीच गव्हर्नर एबॉट यांनी East Plano Islamic Center (EPIC) च्या 400 एकराच्या निवासी व व्यावसायिक प्रकल्पाला विरोध केला होता. या प्रकल्पात घरे, शाळा, मशिद आणि व्यावसायिक सुविधा समाविष्ट होत्या. एबॉट यांनी आरोप केला होता की, हा प्रकल्प “शरिया झोन” मध्ये बदलू शकतो आणि त्यासाठी त्यांनी अनेक राज्य संस्था तपासासाठी नेमल्या होत्या.

ट्रम्प यांचे जवळचे सहकारी

रिपब्लिकन पक्षाचे नेते असलेले गव्हर्नर एबॉट हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी मानले जातात. ते स्थलांतर, धर्म आणि सांस्कृतिक विषयांवर घेतलेल्या कडक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र, टीकाकारांचे म्हणणे आहे की, एबॉट यांनी शरिया कायद्याचा धोका वाढवून सांगितला. यामुळे धार्मिक भेदभावाला चालना मिळू शकते.

Web Title: America News: Ban on 'Sharia law' in the US state of Texas; Muslim organizations protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.