अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 07:01 IST2025-06-12T07:00:56+5:302025-06-12T07:01:16+5:30
Protest In United State News: अमेरिकेत स्थलांतरितांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधातील आंदोलनांनी देश ढवळून निघाला. देशातील १२ राज्यांतील २५ शहरांत निदर्शने सुरू आहेत.

अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
ऑस्टिन (अमेरिका) - अमेरिकेत स्थलांतरितांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधातील आंदोलनांनी देश ढवळून निघाला. देशातील १२ राज्यांतील २५ शहरांत निदर्शने सुरू आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी नॅशनल गार्ड सैन्य व मरीन तैनात केल्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी अधिक आक्रमकपणे निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारबंदीनंतर हजारो लोकांची धरपकड करण्यात येत आहे.
सिएटल, ऑस्टिनपासून शिकागो आणि वॉशिंग्टनपर्यंत मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट एजन्सीविरुद्ध हातात फलक घेऊन विविध मार्गांवर व कार्यालयांबाहेर वाहतूक रोखून धरली. अनेक ठिकाणी आंदोलन शांततेत होत असताना त्यांना पोलिसांच्या बडग्याचा सामना करावा लागला. काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी रसायनांचा वापर करण्यात आला. आंदोलक काही दिवसांत यापेक्षा मोठ्या निदर्शनांची योजना आखत असल्याने आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
...अन्यथा लॉस एंजिलिस जळाले असते : ट्रम्प
निदर्शनांनी ढवळून निघालेल्या लॉस एंजिलिसमध्ये मी सैन्य पाठवले म्हणून बरे झाले. अन्यथा लॉस एंजिलिस जळाले असते, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
स्टारने अमेरिका सोडली
लाखो फॉलोअर्स असलेला जगातील लोकप्रिय टिकटॉकस्टार खाबी लेने त्याच्या व्हिसाची मुदत संपल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेतून निघून गेला.
कुठे काय घडले?
सॅनफ्रान्सिस्को : इमारतींची तोडफोड, वाहने, पोलिस वाहनांचे नुकसान.
सिएटल : सर्वांना मुक्त करा, आयसीई रद्द करा, हद्दपारी करू नका, असे फलक हातात धरत लोकांनी आंदोलन केले.
न्यूयॉर्क शहर : पोलिस बंदोबस्तात मिरवणूक काढण्यात आली.
शिकागो : निदर्शकांची संख्या एक हजारपर्यंत वाढली होती.
बोस्टन : शेकडो लोकांनी आंदोलन केले. डेन्व्हर, सँटा ॲना, ऑस्टिन, डल्लास व वॉशिंग्टनमध्येही आंदोलन केले गेले.