आमच्यावर अमेरिकेचे उपकार; अमेरिकेकडून मदत मिळत राहण्याचा झेलेन्स्की यांना वादानंतरही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:05 IST2025-03-04T10:03:52+5:302025-03-04T10:05:40+5:30
युद्धाचा शेवट खूप खूप दूर!

आमच्यावर अमेरिकेचे उपकार; अमेरिकेकडून मदत मिळत राहण्याचा झेलेन्स्की यांना वादानंतरही विश्वास
लंडन : युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा शेवट खूप, खूप दूर आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझा वाद झाला असला, तरीही अमेरिकेकडून मदत मिळत राहील. आम्हाला अमेरिकेचे महत्त्व कळते. एकही दिवस असा गेला नाही की, जेव्हा आम्ही अमेरिकेचे उपकार मानले नाहीत. अमेरिका आणि युक्रेन नाते तात्पुरते नाही, तर कायमचे असल्याचे वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले आहे.
पश्चिमी देशांमध्ये सध्या वाद वाढला आहे. मात्र झेलेन्स्की यांनी आशावादी सूर कायम ठेवला आहे. ब्रिटन, फ्रान्ससह इतर देशांनी युक्रेनला सर्वतोपरी मदतीच्या घोषणा करून अमेरिकेच्या विरोधात अप्रत्यक्ष आघाडी उघडली आहे.
रशियाविरुद्धच्या सायबर ऑपरेशन्सवर बंदी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने रशियाविरुद्धच्या सायबर ऑपरेशन्सवर बंदी घातली आहे. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी यासाठी अमेरिकेच्या सायबर कमांडला आदेश दिले आहेत. युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियाला चर्चेत सहभागी करून घेणे हा त्याचा उद्देश होता. ट्रम्प प्रशासन रशियाविरोधात केलेल्या सर्व कारवाईचा आढावा घेत आहे. मात्र, याबाबतची माहिती जाहीरपणे दिलेली नाही.
पक्षाची ट्रम्प यांच्यावर टीका
झेलेन्स्की भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातून दबक्या आवाजात टीका होऊ लागली आहे. अलास्काच्या सिनेटर लिझा मुर्कोव्स्की यांच्यासह इतरांनीही ट्रम्प यांच्यावर थेट टीका केली. ट्रम्प यांनी जी अराजकता निर्माण केली आहे ती धक्कादायक आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ करण्याच्या घाईत ते अमेरिकन नागरिकांना दुखावत असून, त्यांचे मित्र त्यांच्यावर विश्वास ठेवताना दिसत नाहीत. ट्रम्प यांनी जगाला अधिक धोकादायक केल्याची टीका अमेरिकेतून होत आहे.
करार करू, सुरक्षेची गॅरंटी हवी
झेलेन्स्की म्हणाले की, मी अमेरिका-युक्रेन खनिज करारावर स्वाक्षरीस तयार आहे, मला मला सुरक्षेची गॅरंटी हवी आहे. व्हाइट हाऊसमध्ये घडलेल्या या घटनेचा फायदा केवळ रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना झाला आहे. (वृत्तसंस्था)