अमेरिकेची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 06:41 IST2018-06-20T05:30:19+5:302018-06-20T06:41:31+5:30
अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अमेरिकेची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा
वॉशिंग्टन- अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नसल्याचं कारण देत अमेरिका दीर्घ काळापासून बाहेर पडण्याच्या धमक्या देत होता. 47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेच्या दूत असलेल्या निकी हेली यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली आहे. निकी हेली म्हणाल्या, अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या मान्य न केल्यानंच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत आहोत. अमेरिका तीन वर्षांपासून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य राहिला आहे. या परिषदेत अमेरिकेला आताच दीड वर्ष पूर्ण झालं होतं.
BREAKING: Trump envoy Nikki Haley says US withdrawing from UN Human Rights Council, calling it 'not worthy of its name.'
— The Associated Press (@AP) June 19, 2018
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज अमेरिकेनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. तत्पूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या सत्ताकाळात तीन वर्षं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर बहिष्कार टाकण्यात आला होता. परंतु ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर 2009मध्ये अमेरिका पुन्हा या परिषदेत सहभागी झाला होता.