युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:26 IST2025-09-10T15:02:22+5:302025-09-10T15:26:19+5:30
युक्रेन -रशिया युद्धाला नवीन वळण आले आहे. रशियन ड्रोनने नाटो देश पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. पोलंडने रशियन ड्रोन पाडला, याची पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी पुष्टी केली आहे.

युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
मागील काही वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाने आता नवीन वळण घेतले आहे. युक्रेनकडे जाणारा रशियन ड्रोन अचानक नाटो देश पोलंडच्या हवाई हद्दीत घुसला. या घटनेमुळे संपूर्ण युरोपमध्ये घबराट निर्माण झाली. पोलंडने हा रशियन ड्रोन हवेत पाडला.
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी स्वतः या घटनेची पुष्टी केली आहे. आज सकाळी युक्रेनने पोलंडला इशारा देत म्हटले आहे की रशियन ड्रोन हवाई हद्दीचे उल्लंघन करत पोलंडच्या झामोस्क शहराकडे जात आहे.
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. 'रशिया पोलंडला इराणी 'शहीद' ड्रोन पाठवत आहे. याला केवळ अपघात म्हणता येणार नाही, कारण एक-दोन नाही तर किमान ८ ड्रोन पोलंडच्या दिशेने गेले आहेत, असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोलंडने ड्रोन पाडला
पोलंड सैन्याने याबाबत स्पष्टीकरण दिले. रशियाने पोलंडला लागून असलेल्या युक्रेनच्या पश्चिम सीमेवर हल्ला केला आहे. या घटनेनंतर पोलंड सैन्य देखील सतर्क आहे. सैन्याने सर्व लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केल्या आहेत.
पोलंड विमाने आकाशात उडत आहेत. तसेच हवाई संरक्षण प्रणाली आणि रडार देखील सक्रिय करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलंडने अद्याप या हल्ल्याशी संबंधित कोणतीही औपचारिक माहिती शेअर केलेली नाही. दरम्यान, पोलंडचे अध्यक्ष करोल नवरोकी यांनीही काल रशिया पोलंडवर हल्ला करू शकतो असा इशारा दिला होता.
'राष्ट्रपती पुतिन यांचे हेतू बरोबर नाहीत, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. अर्थात आम्हाला नेहमीच शांतता हवी असते, परंतु आम्हाला वाटते की पुतिन इतर देशांवरही हल्ला करण्याची तयारी करत आहेत',असे करोल म्हणाले होते.
पोलंड हा नाटोचा सदस्य आहे. रशियन ड्रोनच्या प्रवेशानंतर नाटो देखील सक्रिय झाला आहे. नाटोने आपत्कालीन बैठक बोलावली आहे, यामध्ये या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करता येईल.