पाकिस्तानात रेल्वेवरील हल्ल्यानंतर, मशिदीमध्ये ब्लास्ट; मौलवीसह 4 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 19:12 IST2025-03-14T19:11:27+5:302025-03-14T19:12:03+5:30
मौलवींना भाषण देण्यासाठी मशिदीत तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाला स्फोटक लावण्यात आले होते, असे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.

पाकिस्तानात रेल्वेवरील हल्ल्यानंतर, मशिदीमध्ये ब्लास्ट; मौलवीसह 4 जण जखमी
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका मशिदीत शुक्रवारच्या नमाज दरम्यान बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात मौलवीसह चार जण जखमी झाले आहेत. जिल्हा पोलीस अधिकारी आसिफ बहादर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण वजिरिस्तानमधील मौलाना अब्दुल अजीज मशिदीत आयईडी स्फोट झाला. यात जमियत उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय) जिल्हा प्रमुख मौलाना अब्दुल्ला नदीम आणि इतर जखमी झाले आहेत. मौलवींना भाषण देण्यासाठी मशिदीत तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाला स्फोटक लावण्यात आले होते, असे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना वाना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच बरोबर, पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये यापूर्वीही मशिदींना लक्ष्य करण्यात आले आहे. विशेषतः शुक्रवारच्या नमाजाच्या वेळीच या मशिदींना लक्ष्य केले जाते. कारण या दिवशी मशिदींमध्ये मोठ्या संख्येने लोक नमाज साठी एकत्र येतात. गेल्या महिन्यातच, या प्रांतातील दारुल उलूम हक्कानिया मदरशात आत्मघातकी स्फोट झाला होता. यात JUI-S नेते मौलाना हमीदुल हक हक्कानी यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाले होते.
ट्रेनवरील हल्ल्याचा मुद्दा अद्यापही शांत झालेला नाही. तोच आज पाकिस्तानच्या मशिदीत हा स्फोट झाला. बीएलएच्या दहशतवाद्यांनी बोगद्यातच रेल्वेवर हल्ला केला. यावेळी त्यांनी ट्रेनवर गोळीबार केला आणि प्रवाशांना ओलीस ठेवले, यामुळे सुरक्षा दलांना दोन दिवस माहीम चालवावी लागली. ट्रेन अपहरणाच्या घटनेत २१ नागरिक आणि ४ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे (बीएलए) सर्व ३३ बंडखोर मारले गेले. या ट्रेनमध्ये ४४० प्रवासी होते.