कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:43 IST2025-09-10T16:43:22+5:302025-09-10T16:43:46+5:30
इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे अचानक हवाई हल्ला केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे अचानक हवाई हल्ला केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा हमास नेते अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावावर चर्चा करत होते. या अनपेक्षित कारवाईनंतर आता हा सवाल उपस्थित होत आहे की, इस्रायलचा हमासवरील पुढील हल्ला कुठे होणार? इस्रायली मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, इस्रायलचे पुढील लक्ष्य तुर्की असू शकते आणि अनेक गोष्टी याच दिशेने संकेत देत आहेत.
तुर्की बनला हमासचा 'शेवटचा अड्डा'
हमासच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत कतारमध्ये आश्रय घेतला होता. परंतु, त्यांचे अनेक वरिष्ठ नेते गेल्या अनेक वर्षांपासून तुर्कीमधील इस्तंबूलमध्ये बसूनच आर्थिक व्यवहार आणि दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. दोहाने नेहमीच इस्रायल-हमास युद्धात मध्यस्थीची भूमिका बजावली असल्यामुळे, इस्रायल तिथे हल्ला करेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. पण आता या हल्ल्याने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, इस्रायल हमासला कुठेही शांत बसू देणार नाही. या कारवाईला अमेरिकेची मूक संमती असल्याच्याही कुजबुज होत आहे. याचा अर्थ, आता हमासला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संरक्षण मिळण्याची शक्यता फार कमी झाली आहे.
तुर्कीला नाटोची मदत मिळेल का?
तुर्की आणि हमास दोघांनाही खात्री आहे की, नाटो सदस्यत्व त्यांना हल्ल्यापासून वाचवेल. पण, परिस्थिती इतकी सोपी नाही. नाटो सामूहिक संरक्षणाच्या तत्त्वावर काम करते, ज्यानुसार कोणत्याही एका सदस्यावर झालेला हल्ला हा सर्व सदस्यांवरील हल्ला मानला जातो. पण हा नियम आपोआप लागू होत नाही; त्यासाठी सर्व देशांची संमती आवश्यक असते.
येथेच तुर्कीची अडचण वाढते. स्वीडन आणि फिनलंडसारखे नाटोचे नवीन सदस्य तुर्कीवर नाराज आहेत, कारण त्यांना सदस्यत्व देताना तुर्कीने कुर्द कार्यकर्त्यांना दाबून ठेवण्याच्या अटी घातल्या होत्या. दुसरीकडे, अमेरिकाही तुर्कीच्या दुहेरी भूमिकेवर आणि हमाससोबतच्या जवळीकीवर बारीक लक्ष ठेवून आहे. यामुळे नाटोचा हा हुकुमी एक्काही तुर्कीच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे.