नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 05:54 IST2025-09-11T05:53:57+5:302025-09-11T05:54:52+5:30
संतप्त झालेल्या जनतेने पॅरिससह अन्य शहरांमध्ये बुधवारी उग्र निदर्शने केली. त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले व आगी लावल्या.

नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक
पॅरिस : फ्रान्समधील राजकीय अस्थिरता व अनेक समस्यांची सोडवणूक होत नसल्याने संतप्त झालेल्या जनतेने पॅरिससह अन्य शहरांमध्ये बुधवारी उग्र निदर्शने केली. त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले व आगी लावल्या.
संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच २५० निदर्शकांना अटक करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नव्या पंतप्रधानांची निवड करत असताना त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली.
‘ब्लॉक एव्हरीथिंग’ चा नारा देत लोक उतरले रस्त्यावर
असंख्य निदर्शक ‘ब्लॉक एव्हरीथिंग’ (सर्वकाही ठप्प करा) अशी घोषणा देत रस्त्यावर उतरले. रेन शहरात निदर्शकांनी एका बसला आग लावली. पॅरिसच्या रिंग रोडवर सकाळी आंदोलकांनी अडथळे उभारले, तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना हटविले. या जनआंदोलनाचे लोण बुधवारी फ्रान्सच्या लिले, कान, रेन, ग्रेनोबल आणि ल्योन आदी शहरांतही पसरले.