नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 10:10 IST2025-10-14T09:48:59+5:302025-10-14T10:10:02+5:30
मादागास्कर मध्ये पाणीटंचाईवरून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, आता मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना देश सोडून पळून गेले आहेत. विरोधी पक्ष, लष्कर आणि परदेशी राजदूतांनी त्यांच्या पळून जाण्याची पुष्टी केली आहे.

नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
काही महिन्यापूर्वी नेपाळमध्ये Gen-Z ने सत्ता पालट केली. आता नेपाळपाठोपाठ, आफ्रिकन देश मादागास्करमध्ये मोठ्या संख्येने Gen-Z रस्त्यावर उतरली आणि निदर्शने सुरू केली. पाण्याच्या कमतरतेमुळे तरुण संतापले. त्यांनी सरकारचा राजीनामा मागितला. दरम्यान, मादागास्करचे अध्यक्ष आंद्रे राजोएलिना देश सोडून पळून गेले आहेत.
मादागास्करमधील विरोधी पक्षनेते, लष्कर आणि परदेशी राजदूतांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नेपाळनंतर दुसऱ्यांदा Gen-Z यांना सत्ता परिवर्तनाची सुरुवात करण्यात यश आले आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी दिली माहिती
मादागास्करचे विरोधी पक्षनेते सिटेनी यांनी सांगितले की, रविवारी एक लष्करी तुकडी Gen-Z निदर्शकांमध्ये सामील झाली, यामुळे अध्यक्ष अँड्री यांना देश सोडावा लागला.
सिटेनी यांच्या मते, राष्ट्रपतींच्या जाण्याची माहिती मिळाल्यानंतर, आम्ही राष्ट्रपती भवनमधील कर्मचाऱ्यांना बोलावले. अँड्री कोणालाही न कळवता देश सोडून पळून गेले आहेत. राष्ट्रपती भवनने अद्याप या प्रकरणावर औपचारिक निवेदन जारी केलेले नाही.
राष्ट्रपतींनी राष्ट्राला संबोधित केले
सोमवारी रात्री उशिरा त्यांनी फेसबुकवर राष्ट्राला संबोधित केले. ते त्यांच्या पत्नीचे प्राण वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. त्यांनी त्यांचा ठावठिकाणा उघड केला नाही. मादागास्कर नष्ट होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष अँड्री फ्रेंच लष्करी विमानाने देश सोडून पळून गेले. मादागास्कर पूर्वी फ्रेंच वसाहत होती. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की त्यांच्याकडे या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही.
नेपाळ आणि केनियामध्ये Gen-Z चळवळीनंतर, २५ सप्टेंबर रोजी, मादागास्करमधील तरुणांनीही पाणी आणि वीज टंचाईचे कारण देत सरकारवर हल्ला केला. लष्करानेही निदर्शकांना पाठिंबा दिला, यामुळे अध्यक्ष अँड्री यांच्या समस्या आणखी वाढल्या.