जोहान्सबर्ग: भारताने बांग्लादेशी घुसखोरांविरोधात कारवाई तीव्र केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही अशाच प्रकारची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात बनावट व्हिसावर देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 16 बांग्लादेशी नागरिकांना दक्षिण आफ्रिकेतून डिपोर्ट करण्यात आले आहे.
विमानतळावरच अटक
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व बांग्लादेशी नागरिक इथिओपियन एअरलाईन्सच्या विमानाने जोहान्सबर्ग येथील ओ. आर. टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. मात्र पासपोर्ट क्लिअरन्सदरम्यान त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. तपासात त्यांच्या व्हिसा व इतर प्रवास कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर त्यांना बांग्लादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी मोहीम
बॉर्डर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या कार्यवाहक आयुक्त जेन थुपाना यांनी सांगितले की, ही कारवाई गर्दीच्या काळात मानव तस्करी, अनियमित स्थलांतर आणि सीमापार संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या तपशीलांचे विश्लेषण केल्यानंतर या बांग्लादेशी नागरिकांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आले. प्राथमिक तपासात मानव तस्करी करणाऱ्या सिंडिकेट्सची एक ठराविक पद्धत समोर आली आहे. यात संबंधित व्यक्ती शेजारील देशांमार्गे दक्षिण आफ्रिकेत ट्रान्झिट करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर पुन्हा देशात प्रवेश करतात.
एअरलाइनवरही आर्थिक दंड
जेन थुपाना यांनी सांगितले की, बेकायदेशीर प्रवाशांना देशात आणणाऱ्या संबंधित एअरलाईनवर प्रत्येक प्रवाशामागे 15,000 रँड इतका दंड ठोठावण्यात येणार आहे. प्रवासापूर्वी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, ही एअरलाईनची जबाबदारी होती. या बांग्लादेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्याचा संपूर्ण खर्चही एअरलाईनलाच उचलावा लागणार आहे.
मोठ्या संख्येने बांगला्देशी वास्तव्यास
दक्षिण आफ्रिकेत बांग्लादेश, पाकिस्तान, सोमालिया आणि इथिओपिया येथून बेकायदेशीर स्थलांतर होत असल्याबाबत दीर्घकाळापासून चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकदा स्थानिक एजंट्सच्या मदतीने आणि काही वेळा गृहविभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे, अगदी दक्षिण आफ्रिकन पासपोर्टसह, देशात प्रवेश केला जातो. अंदाजानुसार दक्षिण आफ्रिकेत सध्या 3.5 लाखांहून अधिक बांग्लादेशी वंशाचे नागरिक वास्तव्यास आहेत. यापैकी बहुतांश लोकांनी 1994 मध्ये नेल्सन मंडेला यांच्या निवडणुकीनंतर राजकीय आश्रय घेतला होता.