नाट्यमय घडामोडींनंतर तुर्कीतील टिष्ट्वटबंदी मागे
By Admin | Updated: April 7, 2015 23:13 IST2015-04-07T23:13:25+5:302015-04-07T23:13:25+5:30
तुर्कस्तानात दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या वकिलाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्याने इस्तंबुल येथील न्यायालयाने सोमवारी ट्विटरवर बंदी घातली.

नाट्यमय घडामोडींनंतर तुर्कीतील टिष्ट्वटबंदी मागे
इस्तंबुल : तुर्कस्तानात दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या वकिलाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्याने इस्तंबुल येथील न्यायालयाने सोमवारी ट्विटरवर बंदी घातली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ही बंदी कायम होती. मेहमत सेलिम किराझ या वकिलाचे अपहरण गेल्या आठवड्यात झाले होते व नंतर ओलिस आणि पोलीस यांच्यातील चकमकीत तो मारला गेला. या संवेदनशील घटनेची फिल्म दाखविण्यास इस्तंबुल न्यायालयाने ट्विटरला बंदी घातली होती. त्यानंतर ट्विटरची सेवा सोमवारी रात्रीपर्यंत बंद होती.
ट्विटरवरील या बंदीचा परिणाम इतर सोशल वेबसाईटस्वर झाला. फेसबुकनेही न्यायालयाच्या आदेशानुसार आपला काही मजकूर ब्लॉक केला. सोमवारी सायंकाळी इस्तंबुल न्यायालयाने गुगललाही वादग्रस्त मजकूर व छायाचित्रे काढून टाकण्याचा आदेश दिला. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा झालेल्या वाटाघाटीनंतर ही बंदी उठवण्यात आली.
तुर्कस्तानचे अध्यक्ष तय्यिप इरोदगान यांचा प्रवक्ता इब्राहीम कलीनने या संदर्भात बोलताना सांगितले की, बंदुकीच्या धाकावर अपहरण केलेल्या व नंतर मरण पावलेल्या वकिलाची छायाचित्रे व मजकूर काढून टाकण्याची मागणी वकिलाच्या कुटुंबियांनी केली होती. सोशल वेबसाईटस् ओलिसांची छायाचित्रे प्रसिद्ध करून दहशतवाद्यांच्या भूमिकेचा प्रसार करत आहेत, असे कलीनने अंकारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या वर्षी तुर्कस्तानने सोशल वेबसाईटस्वर कधीही बंदी घालता यावी असे कायदे केले आहेत. २०१४ च्या दुसऱ्या सहामाहीत तुर्की सरकारने पाच वेळा ट्विटरवर मजकूर काढून टाकण्यासाठी दबाव आणला .