अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 19:25 IST2025-09-12T19:25:32+5:302025-09-12T19:25:45+5:30
Mexico tariff news: चीनसह इतर आशियाई देशांमधून मेक्सिकोमध्ये आयात केल्या जाणाऱ्या सर्व कारवर ५० टक्के टेरिफ लावले जाणार असल्याची घोषणा मेक्सिकोने केली आहे.

अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
अमेरिकेनंतर आता शेजारी देश मेक्सिकोने आशियाई देशांवर जबर टेरिफ लादले आहे. चीनसह इतर आशियाई देशांमधून मेक्सिकोमध्ये आयात केल्या जाणाऱ्या सर्व कारवर ५० टक्के टेरिफ लावले जाणार असल्याची घोषणा मेक्सिकोने केली आहे.
आम्हाला आमच्या देशातील नोकऱ्या वाचवायच्या आहेत, असे कारण मेक्सिकन सरकारने दिले आहे. परंतू यामागे अमेरिकेले खूश करण्याची रणनिती असल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे. आशियातून येणाऱ्या स्टील, टेक्सटाईलसह अनेक क्षेत्रातील वस्तूंवर नवीन टेरिफ लावले जाणार असल्याचे मेक्सिकन अर्थमंत्रालयाने जाहीर केले.
मेक्सिकोचे अर्थमंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी केवळ एका लेव्हलच्या सुरक्षेने तुम्ही लढू शकणार नाही, असे यावर म्हटले आहे. चीनच्या गाड्या खूप स्वस्त किंमतीत विकल्या जात आहेत. यामुळे मेक्सिकन कंपन्या धोक्यात आहेत. आम्हाला नोकऱ्या वाचवायच्या आहेत. हे टेरिफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने नेमून दिलेल्या नियमांमध्येच आहे, असे ते म्हणाले.
मेक्सिकोशी कोणताही व्यापार करार नसलेल्या देशांवर हे नवीन टेरिफ नियम लागू होणार आहेत. यामध्ये भारतासह चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, रशिया, थायलंड आणि तुर्की हे देश आहेत. मेक्सिकोच्या एकूण आयातीपैकी ८.६ टक्के आयातीवर परिणाम होणार असून ३.२५ लाख औद्योगिक आणि उत्पादन नोकऱ्या सुरक्षित होतील, असे सरकारी अहवालात म्हटले आहे.