ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ह्युस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अमेरिकेत राहणाऱ्या 50 हजार भारतीयांना मोदी यांनी संबोधित केले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही मोदी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी भारतीयांना आवाहन केले.
अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांसमोर ट्रम्प यांची स्तुती केली. ''आज आमच्यासोबत एक खास पाहुणे आले आहेत. त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. कारण त्यांना पृथ्वीवर राहणारा प्रत्येक माणूस ओळखतो. त्यांचे नाव जागतिक राजकारणात प्रत्येकवेळी घेतले जाते. त्यांना करोडो लोक फॉलो करतात. भारताचे चांगले मित्र अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये असल्याचा अभिमान असल्याचे, मोदी म्हणाले.
तसेच दोन्ही देशांदरम्यान नाती मजबूत झालेली आहेत. ह्यूस्टन ते हैदराबाद, बोस्टन ते बेंगळुरू, शिकागो ते शिमला, लॉस अँजेलिस ते लुधियाना अशी नाती मजबूत असल्याचे मोदी यांनी नेहमीच्या शैलीत संदर्भ जोडत सांगितले.