समुद्रात बोटिंग करत असलेल्या तरुणाला व्हेलने गिळले, तरीही जिवंत बचावला, असा घडला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:20 IST2025-02-14T15:20:03+5:302025-02-14T15:20:16+5:30
International News: व्हेल माशांच्या तावडीतून कुणी सुटला तर तो चमत्कारच, अशीच आश्चर्यकारक घटना चिली देशातील पटगोनिया येथे घडली आहे. येथे समुद्रात पोहत असलेल्या तरुणाला एका व्हेल माशाने गिळले. मात्र आश्चर्यकारकरीत्या तो मृत्यूच्या दाढेतून परत आला.

समुद्रात बोटिंग करत असलेल्या तरुणाला व्हेलने गिळले, तरीही जिवंत बचावला, असा घडला चमत्कार
जगातील सर्वात मोठा प्राणी असलेल्या व्हेल माशांचं खोल समुद्रामध्ये निर्विवाद राज्य असतं. या व्हेल माशांच्या तडाख्यामुळे अनेकदा छोट्या होड्या, बोटीही उलटतात. त्यात एखादा माणूस या महाकाय व्हेलच्या तावडीत सापडला तर त्याचा मृत्यू निश्चितच. अशा व्हेल माशांच्या तावडीतून कुणी सुटला तर तो चमत्कारच, अशीच आश्चर्यकारक घटना चिली देशातील पटगोनिया येथे घडली आहे. येथे समुद्रात पोहत असलेल्या तरुणाला एका व्हेल माशाने गिळले. मात्र आश्चर्यकारकरीत्या तो मृत्यूच्या दाढेतून परत आला. ही घटना मागच्या आठवड्यात आठ फेब्रुवारी रोजी घडली.
चिलीमधील पटगोनिया येथे अॅड्रियन सिमानकास नावाच्या तरुणासोबत ही घटना घडली. तो त्याच्या वडिलांसोबत समुद्रामध्ये कायाकिंग करत होता. तेवढ्यात एका महाकाय व्हेल माशाने त्यांना गिळले. जेव्हा व्हेल मासा जवळ आला आणि त्याने तोंड उघडलं. तेव्हा वडील डेल यांनी मुलगा अॅड्रियन याला शांत राहण्यास सांगितले. डेल यांनी त्या क्षणाचा व्हिडीओसुद्धा चित्रित केला. त्यामध्ये ते शांत राहा, शांत राहा असे सांगत आहेत.
या तरुणाने हा अनुभव कथन करताना सांगितले की, व्हेल माशाने गिळले तेव्हा आता मी जिवंत राहू शकणार नाही असेच मला वाटले. आता हा व्हेल मासा माझ्या वडिलांवरही हल्ला तर करणार नाही ना, याची चिंता मला वाटत होती. मात्र काही वेळातच व्हेल माशाने मला तोंडातून बाहेर फेकले आणि मी बचावलो.