इस्रायलकडून ट्रम्प यांना खास गिफ्ट! आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या नावानं ओळखलं जाणार हे शहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:33 IST2025-01-23T11:31:38+5:302025-01-23T11:33:14+5:30
या भागांतील यहुदी समुदायात ट्रम्प अत्यंत लोकप्रिय आहेत आणि ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शहराचे महापौर गाय यिफ्राच यांनी ही घोषणा केली.

इस्रायलकडून ट्रम्प यांना खास गिफ्ट! आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या नावानं ओळखलं जाणार हे शहर
अमेरिका आणि इस्रायलची मैत्री सर्वपरिचित आहे. मग इराणविरुद्धचे शत्रुत्व असो अथवा गाझा युद्धादरम्यान शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे असो. अमेरिका सातत्याने इस्रायलच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. आता अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या सन्मानार्थ इस्रायलने एक खास गिफ्ट दिले आहे. येथील एक शहर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ओळखले जाईल. ज्युडिया नावाच्या या शहराच्या भागाचे नाव बदलून ट्रम्प असे करण्यात आले आहे.
अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या सन्मानार्थ या ठिकानाचे नाव "ट्रम्प वन" (T1), असे ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4,000 एकरमध्ये या भागाला पूर्वी ई1 अथवा मेवासेरेट अदुमिम नावाने ओळखले जात होते. या भागांतील यहुदी समुदायात ट्रम्प अत्यंत लोकप्रिय आहेत आणि ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शहराचे महापौर गाय यिफ्राच यांनी ही घोषणा केली.
ते म्हणाले, ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ इस्रायली समाजाला आणखी मजबूत करण्याची एक चांगली संधी आहे. विशेष करून जुडिया आणि सामरियामध्ये. आम्हाला ट्रम्प यांच्यावर विश्वास आहे की, ते येणाऱ्या काळात या भागाच्या विकासाला चालना देतील.
ट्रम्प यांच्या नावाने ओळखला जातो गोलन समुदाय -
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्या झालेल्या करारानुसार, या भागावर सध्या इस्रायलचे नियंत्रण आहे. आता ट्रम्प यांच्या नावाने ओळखला जाणारा हा भाग मा'ले अदुमिम सीमेच्या आत आहे. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आंतराष्ट्रीय विरोधामुळे बायडेन प्रशासनाने येथे 3,000 हून अधिक घरे बांधण्याची योजना स्थगित केली होती. इस्रायलमध्ये एका गोलन समुदायाचे नावही ट्रम्प यांच्या नावाने ठेवण्यात आले होते. 2019 मध्ये गोलन हाइट्सवर इस्रायलच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिल्याबद्दल त्यांचा अशा पद्धतीने सन्मान करण्यात आला होता.