लंडन : आफ्रिका खंडातील इथिओपिया या देशातील अफार भागात जिथे तीन टेक्टॉनिक प्लेट एकत्र येतात तिथे भूगर्भामध्ये हृदयाच्या ठोक्यांसारखी नियमित स्पंदने जाणवत आहेत. या भूगर्भात खोलवर असलेल्या मॅग्मा म्हणजेच अतिशय तप्त द्रवामुळे ही स्पंदने जाणवत असून, त्याचा परिणाम म्हणजे आफ्रिका खंडाचे हळूहळू विभाजन होत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या जागी नवा महासागर निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील साऊथॅम्पटन विद्यापीठातील संशोधकांनी यासंदर्भात केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे.
या संशोधनामुळे जगभरातील भूगर्भ शास्त्रज्ञांचे लक्ष आता आफ्रिकेतील या भूगर्भातील हालचालींकडे वेधले गेले आहे.
भूगर्भ, पृष्ठभागातही होणार बदल
पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींबाबत झालेल्या संशोधनातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एम्मा वॉट्स यांनी सांगितले की, इथिओपियातील अफार या ठिकाणी भूगर्भात सुरू असलेल्या हालचालींमुळे पृथ्वीचा जमिनीखालील भाग व पृष्ठभाग यांच्यात आतील भाग आणि पृष्ठभाग यांच्यातही बदल होत आहेत.
असे झाले संशोधन
अफार प्रदेश व इथिओपियाच्या परिसरातून संशोधकांनी १३०हून अधिक ज्वालामुखीजन्य खडकांचे नमुने गोळा केले. त्याचबरोबर याविषयी आधी उपलब्ध असलेली माहिती व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पृथ्वीच्या भूगर्भाच्या संरचनेसंदर्भात अभ्यास केला.
त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. साऊथॅम्प्टन विद्यापीठातील पृथ्वीशास्त्राचे प्राध्यापक आणि या संशोधनाच्या अहवालाचे सहलेखक टॉम गेरनॉन म्हणाले, विविध खडकांच्या नमुन्यांच्या अभ्यासावरून असे दिसते की, पृथ्वीच्या भूगर्भात बऱ्याच हालचाली सुरू आहेत. अगदी हृदयाच्या ठोक्यांसारखी स्पंदने त्यामुळे होत असावीत.