इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 22:25 IST2025-09-25T22:25:27+5:302025-09-25T22:25:56+5:30
महत्वाचे म्हणजे, यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही तेलअवीवजवळ तीन बसेसनाही स्फोटक उपकरणांच्या सहाय्याने लक्ष्य करण्यात आले होते.

इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
गेल्या फेब्रुवारी महिन्यात इस्रायलमध्ये काही बसेसमध्ये झालेल्या स्फोटांनंतर, आता तेलअवीवमध्ये एका कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इजरायलच्या चॅनल 12 ने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार, तेल अवीवच्या रस्त्यावर पार्क केलेल्या एका कारमध्ये हा ब्लास्ट झाला. यात अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याद एलियाहू परिसरातील ला गार्डिया रस्त्यावरील घटना -
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील याद एलियाहू परिसरातील ला गार्डिया रस्त्यावर हा स्फोट झाला. घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटात जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी तेलअवीवमधील इचिलोव्ह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इजरायली पोलिसांनी या प्रकरणाला गुन्हेगारी घटना म्हणून संबोधले असून तपास सुरू केला आहे. सध्या ला गार्डिया रस्त्याचा काही भाग सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला आहे.
यापूर्वी तीन बसेसनाही करण्यात आले होते लक्ष्य -
महत्वाचे म्हणजे, यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही तेलअवीवजवळ तीन बसेसनाही स्फोटक उपकरणांच्या सहाय्याने लक्ष्य करण्यात आले होते. त्या घटनेला अधिकाऱ्यांनी दहशतवादी हल्ला असे संबोधले होते. सुदैवाने त्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. महत्वाचे म्हणजे, फेब्रुवारी महिन्यातील हल्ल्यात वापरण्यात आलेली पाचही स्फोटके, एकसारखी होती आणि त्यांना टायमर लावण्यात आले होते, हा एका सुनियोजित कटाचा भाग असल्याची शक्यता आहे, असे तेव्हा पोलिसांनी म्हटले होते.