आफ्रिकेतील या देशात भीषण नरसंहार, रस्त्यावर पडले ९०० मृतदेह, शेजारील देशाने घडवला रक्तपात, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:48 IST2025-02-04T12:47:46+5:302025-02-04T12:48:16+5:30
Congo News: आफ्रिकेतील कांगो हा देश मागच्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. यात ९०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. बंडखोर समुहांनी मंगळवारी एका मानवतावादी युद्धविरामाची धोषणा केली आहे. या समुहांमध्ये रवांडाचा पाठिंबा असलेल्या एम२३ या बंडखोरांचाही समावेश आहे.

आफ्रिकेतील या देशात भीषण नरसंहार, रस्त्यावर पडले ९०० मृतदेह, शेजारील देशाने घडवला रक्तपात, कारण काय?
आफ्रिकेतील कांगो हा देश मागच्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. यात ९०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. बंडखोर समुहांनी मंगळवारी एका मानवतावादी युद्धविरामाची धोषणा केली आहे. या समुहांमध्ये रवांडाचा पाठिंबा असलेल्या एम२३ या बंडखोरांचाही समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने सोमवारी सांगितले की, मागच्या आठवड्यात कांगो सरकारचं सैन्य आणि रवांडाचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांमध्ये गोमा शहरात पाच दिवस चाललेल्या संघर्षामध्ये किमान ९०० लोक मारले गेले आहेत. आधी हा आकडा ७७३ असल्याचं सांगितलं जात होतं.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात सांगितले की, गोमाच्या रस्त्यांवरून शुक्रवारपर्यंत किमान ९०० मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते. एम२३ बंडखोरांनी शहरावर कब्जा करताना हा संघर्ष उदभवला होता. या संघर्षामध्ये सुमारे २ हजार ९०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. कांगो हा देश आपल्या खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र याच खनिज संपत्तीवरून मागच्या ३० वर्षांपासून या देशात प्रचंड संघर्ष सुरू आहे. १९९४ मध्ये झालेल्या रवांडा नरसंहारानंतर या संघर्षाला तोंड फुटलं होतं. अनेक सशस्त्र गटांमध्ये सत्ता आणि खनिज संपत्तीवर नियंत्रणासाठी स्पर्धा सुरू आहे. या अस्थिरतेचा प्रभाव शेजारील देशांवरही पडला आहे. १९९० मध्ये या भागात झालेल्या संघर्षात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता.