ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:20 IST2025-11-07T13:19:49+5:302025-11-07T13:20:18+5:30
वजन कमी करण्याच्या औषधांच्या किमती कमी करण्याच्या महत्त्वपूर्ण कराराची घोषणा करत असताना, एक अनपेक्षित घटना घडली.

ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये वजन कमी करण्याच्या औषधांच्या किमती कमी करण्याच्या महत्त्वपूर्ण कराराची घोषणा करत असताना, एक अनपेक्षित घटना घडली. नोवो नॉर्डिस्क या प्रमुख फार्मा कंपनीचे प्रतिनिधी गॉर्डन फिंडले अचानक स्टेजजवळ बेशुद्ध होऊन कोसळले. यामुळे सुमारे तासभर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
गुरुवारी (स्थानिक वेळेनुसार) ट्रम्प यांनी औषध कंपन्या एली लिली आणि नोवो नॉर्डिस्क सोबत झालेल्या कराराची घोषणा केली. या करारानुसार, वेगोवी आणि झेपबाउंड सारख्या लोकप्रिय GLP-1 औषधांच्या किमती कमी होणार आहेत. ही घोषणा करताना फिंडले ट्रम्प यांच्या मागील बाजुला उभे होते. तेवढ्यात त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांना त्वरीत त्यांना सावरत व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले.
या घटनेमुळे व्हाईट हाऊसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेतील कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने त्वरीत परिस्थिती हाताळली. लाइव्ह प्रसारण त्वरित थांबवण्यात आले आणि पत्रकारांना बाहेर काढण्यात आले.
ट्रम्प यांची प्रतिक्रिया
सुमारे ३० मिनिटांनंतर पत्रकार परिषद पुन्हा सुरू झाल्यावर ट्रम्प यांनी माहिती दिली की, "कंपन्यांच्या प्रतिनिधींपैकी एकाला थोडा त्रास झाला आणि ते खाली पडले. पण ते आता ठीक आहेत. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे."