रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 05:58 IST2025-07-31T05:56:49+5:302025-07-31T05:58:05+5:30
या भूकंपाने मात्र कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
टोकियो : पृथ्वीच्या इतिहासातील सर्वांत तीव्र क्षमतेच्या भूकंपापैकी एक ठरलेल्या ८.८ रिश्टर स्केलच्या भूकंपानेरशिया हादरले. लगेच पॅसिफिक महासागर क्षेत्रात त्सुनामीचा अलर्ट देण्यात आला. या दहशतीने संपूर्ण जगात भीतीचे हादरे बसले. जपानमध्ये आलेली त्सुनामी, भारतात धडकलेल्या लाटांची सर्वांना पुन्हा आठवण झाली. धडधड वाढली.
रशियातील कामचातका द्वीपकल्प परिसरात या भूकंपाचे केंद्रबिंदू होते. त्यानंतर आलेल्या त्सुनामीच्या लाटा जपान, हवाई बेटे व पॅसिफिक क्षेत्रांतील इतर भागांत धडकल्या. या भूकंपाने मात्र कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
त्सुनामीचा इशारा रशियाने मागे घेतला
कामचातका द्वीपकल्प व कुरिल बेटांवर झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर ३० धक्के जाणवले. त्यानंतर दिलेला त्सुुनामीचा इशारा आता रशियाने मागे घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीचा धोका काही प्रमाणात कायम आहे असेही रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बंदरे पाण्याखाली, लोकांनी केले तात्पुरते स्थलांतर
कामचातका द्वीपकल्पावर जिथे भूकंपाचे केंद्रस्थान आहे तेथील काही बंदरे पाण्याखाली गेली असून, तेथील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतर केले आहे. जपानच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर त्सुनामीच्या मोठ्या लाटा धडकल्या. हवाईतील राजधानीत वाहतूक ठप्प झाली होती. कामचातका द्वीपकल्पात ३ ते ४ मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद करण्यात आली. जपानच्या होक्काईदो बेटावर ६० सेंमी तर अलास्काच्या अलेउशियन बेटांवर अंदाजे ३० सेंमी उंचीपर्यंत लाटा उसळल्या. जपानमधील अणुऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.