६८ भारतीयांसह ६४५ हज यात्रेकरूंचा उष्णतेच्या लाटेमुळे मक्का येथे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:22 AM2024-06-20T10:22:49+5:302024-06-20T10:23:11+5:30

महाझळा : तापमान ५२ अंशांवर; नातेवाइकांची मृतदेह ताब्यात घेण्यासाठी धडपड.

645 Haj pilgrims including 68 Indians die in Mecca due to heat wave | ६८ भारतीयांसह ६४५ हज यात्रेकरूंचा उष्णतेच्या लाटेमुळे मक्का येथे मृत्यू

६८ भारतीयांसह ६४५ हज यात्रेकरूंचा उष्णतेच्या लाटेमुळे मक्का येथे मृत्यू

मक्का : हज यात्रेसाठी जगभरातून सौदी अरेबियात आलेल्या लाखो यात्रेकरूंना यंदा उष्णतेच्या महालाटेचा फटका बसत आहे. मक्का आणि या पवित्र शहराच्या परिसरातील तापमान ५२ अंशांवर गेले आहे. झळांनी लाहीलाही व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या काही दिवसांमध्ये ६८ भारतीयांसह ६४५ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उष्माघाताचा त्रास जाणवू लागलेल्या हजारो लोकांना आसपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. 

सौदी अरेबियाने मात्र यात्रेदरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येवर भाष्य केलेले नाही तसेच त्याची कोणतीही कारणे दिली नाहीत. परंतु, शेकडो लोक मक्कामधील अल-मुईसेम परिसरातील आपत्कालीन संकुलात रांगेत उभे होते आणि त्यांच्या बेपत्ता कुटुंबातील सदस्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑनलाइन प्रसारित झालेल्या एका यादीनुसार पाच दिवसांच्या हजदरम्यान किमान ६४५ भाविक मरण पावल्याचा दावा करण्यात आला आहे. 

६०० मृतदेह संकुलात 
यादीतील नावे खरी दिसत आहेत, असा दावा नाव न छापण्याच्या अटीवर एका डॉक्टरने वृत्तसंस्थेकडे केला. किमान ६०० मृतदेह संकुलात आहेत, असा दावा दुसऱ्या एका अधिकाऱ्याने केला. मृतांच्या ऑनलाइन यादीत या भाविकांच्या मृत्यूचे कोणतेही कारण दिले गेले नाही. महाराष्ट्र राज्य हज समितीने स्पष्ट केले की राज्यातील यात्रेकरू सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणताही त्रास झालेला नाही. 

२०२४ मध्ये  १८ लाखांहून अधिक यात्रेकरू
सौदी हज अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २०२४ मध्ये १८.३ लाखांहून अधिक मुस्लिमांनी हज केले, ज्यात २२ देशांतील १६ लाखांहून अधिक यात्रेकरू आणि सुमारे २ लाख २२ हजार सौदी नागरिक आणि रहिवासी यांचा समावेश आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था
अल्जेरिया, इजिप्त आणि भारतातील भाविकांचा समावेश असलेल्या मृतांची नावे आणि राष्ट्रीयत्व जाहीर करताना संकुलात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मृतांच्या नातेवाइकांना मृताची ओळख पटविण्यासाठी आत जाण्याची परवानगी देण्यात येत होती. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचे कारण अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेकडे स्पष्ट केले नाही.
सौदी अरेबियाने वार्षिक पाच दिवसांच्या हज यात्रेला उपस्थित राहणाऱ्यांची गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा उपायांवर अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत; परंतु, सहभागींची संख्या मोठी असल्याने ते कठीण होते.

काबा प्रदक्षिणेनंतर हज यात्रा पूर्ण
हज यात्रेकरूंनी मंगळवारी तिसऱ्या दिवशी तीव्र उष्णतेदरम्यान त्यांची यात्रा सुरूच ठेवली. सैतानाला प्रतीकात्मक दगड मारण्याची प्रथा आणि इस्लामचे पवित्र स्थान असलेल्या काबाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून यात्रा पूर्ण केली.

Web Title: 645 Haj pilgrims including 68 Indians die in Mecca due to heat wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.