इराण - इस्त्रायल यांच्यातील युद्धविरामानंतर गाझा येथेही शांतता होणार आहे. इस्त्रायलने गाझामध्ये ६० दिवस युद्धविराम करण्यास सहमती दाखवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. परंतु यासाठी काही अटीही ठेवल्या आहेत. ट्रम्प यांनी हमासलाही इशारा दिला आहे. गाझामधील स्थिती आणखी बिघडण्यापूर्वी साम्यजस्याने मार्ग काढावा असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, माझ्या प्रतिनिधींनी आज गाझा इस्त्रायल मुद्द्यावर इस्त्रायली नेत्यांसोबत चर्चा केली. दीर्घवेळ चाललेल्या या बैठकीत इस्त्रायलने ६० दिवस गाझामध्ये युद्धविराम करण्यास अटींसह सहमती दर्शवली आहे. याकाळात हे युद्ध संपवण्यासाठी आम्ही दोन्ही बाजूंना एकत्र आणून काम करू. कतार आणि मिस्त्र नेत्यांनी ही शांतता आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. ते अंतिम प्रस्ताव सादर करतील. मला खात्री आहे, मध्य पूर्वेतील देशांच्या हितासाठी हमास या तडजोडीचा स्वीकार करेल. कारण त्यांनी जर हे स्वीकारले नाही तर ते योग्य ठरणार नाही. तिथली परिस्थिती आणखी बिघडू शकते असं त्यांनी म्हटलं.
७ जुलैला इस्त्रायलचे पंतप्रधान अमेरिकेत जाणार
येत्या ७ जुलै रोजी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेणार आहेत. व्हाइट हाऊसने इस्त्रायल टाइम्सला याची पुष्टी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प गाझामध्ये युद्धविराम आणि तिथल्या बंधकांच्या सुटकेसाठी वेगाने हालचाली करत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत पुन्हा सत्तेत परतले. त्यानंतर नेतन्याहू यांचा अमेरिकेतील हा तिसरा दौरा आहे. ही भेट गाझा येथील युद्धविराम, इराणसोबत प्रादेशिक हालचाली आणि राजनैतिक संबंधांचा विस्तार यावर केंद्रीत असेल.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच संघर्ष संपवून नव्याने गाझा येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी फोकस करणार असल्याचे संकेत दिले होते. नेतन्याहू यांचा अमेरिका दौरा इराणच्या न्यूक्लियर फॅसिलिटीवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर होत आहे. आधी भारत-पाकिस्तान, मग इराण-इस्त्रायल यानंतर डोनाल्ड ट्रम्प गाझा येथे संघर्ष थांबवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.