लहानपणी भातुकलीचा खेळ तुम्ही कधी खेळला आहात? या खेळात लहान मुलं खोटा-खोटा संसार थाटतात. घरात आई-वडिलांच्या जशा भूमिका असतात, तशाच भूमिका साकारतात. स्वयंपाकाची भांडी, गॅस सिलिंडर... विविध बाहुल्या यांचा वापर करून आपल्या कल्पनेतलं ‘कुटुंब’ साकारतात.. भातुकलीचा हा खेळ मुलांना सामाजिक, कौटुंबिक भूमिका आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतो.
अफगाणिस्तानमध्येही असंच होतं. तिथेही लहान मुलींची लग्नं होतात. संसार थाटला जातो. त्यांना मुलं होतात. आताच सहा वर्षांच्या एका मुलीचं लग्न झालं. फरक फक्त इतकाच की हा ‘भातुकलीचा खेळ’ नव्हता, नसतो. ती खरोखरची लग्नं असतात आणि तिथल्या अल्पवयीन, शाळकरी मुलींनाही मुलं होतात! बऱ्याचदा नवरा मुलगा मात्र फारच थोराड म्हणजे ज्या मुलीशी त्यानं लग्न केलंय, करतोय, तो तिच्या बापाच्या किंवा आजोबाच्या वयाचा असतो अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात सहा वर्षांच्या मुलीशी एका ४५ वर्षांच्या माणसानं नुकताच ‘निकाह’ लावला. त्यावरून ‘पुन्हा एकदा’ केवळ जगभरातच नव्हे, तर खुद्ध अफगाणिस्तानातही खळबळ माजली आहे. या लग्नाचे फोटो पाहिल्यावर तालिबानचे अधिकारीही हैराण झाले. त्यांनी त्या मुलीला सासरी जाण्यापासून रोखलं. पोलिसांनी मुलीचे वडील आणि नवऱ्याला अटक केली.
तालिबानच्या अधिकाऱ्यांनी फर्मावलं, मुलगी लहान असल्यानं तिला सासरी पाठवता येणार नाही; पण पुढे हेही स्पष्ट केलं, नऊ वर्षांची झाल्यावर(च) तिला सासरी पाठवता येईल!! तालिबाननं या सहा वर्षांच्या मुलीला सासरी जाण्यापासून तर अटकाव केला; पण नऊ वर्षांची झाल्यावर तिला सासरी जाता येईल असं सांगून त्या मुलीची आणि तिच्यासारख्या मुलींची थट्टाच केली आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. अफगाणिस्तानात बालविवाह नवीन नाहीत. मुलींचे, तरुणींचे म्हाताऱ्यांबरोबर विवाह लावले जातात. २०२१मध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर तर अशा प्रकरणांना ऊतच आला आहे. आधीच अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणावर बंदी आणण्यात आली आहे. सहावीच्या पुढे त्या शिकू शकत नाहीत. हिजाबशिवाय आणि घरचा कोणी पुरुषमाणूस सोबत असल्याशिवाय त्या घराबाहेर पडू शकत नाहीत, नोकरी करू शकत नाहीत, समाजाचे विशेषत: पुरुषांचे, तालिबान्यांचे डोळे त्यांच्यावर कायम रोखलेले असतात, त्यामुळे कुटुंबं आणि पालकांनाही मुली म्हणजे एक मोठा बोजा वाटायला लागतो. अशा परिस्थितीत त्यांना घरी ‘सांभाळण्यापेक्षा’ एकदाचं त्यांना उजवून टाकावं, त्यांचं लग्न करून टाकावं आणि एका जबाबदारीतून, ‘कटकटीतून’ मुक्त व्हावं, अशीच तेथील लोकांची मानसिकता होत चालली आहे.
युनिसेफच्या अहवालानुसार तर अफगाणिस्तान हा जगात सर्वाधिक बालवधू असलेला देश होत चालला आहे. तिथे किमान २५ टक्के मुलींचे बालविवाह होतात, वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच गर्भवती होणाऱ्या मुलींच्या संख्येतही तब्बल ४५ टक्के वाढ झाली आहे. तिथल्या गरीब पालकांनाही मुलींचं लहानपणीच लग्न लावून देणं ‘परवडतं’; कारण मुलगी जेवढी लहान, जेवढी सुंदर, त्यानुसार नवरदेवाकडून त्यांना आकर्षक ‘हुंडा’ मिळतो!