४०१ जणांनी १० तास केली मोजणी; बांगलादेशातील 'या' मशिदीला भरभरून दान, फक्त २४ तासांत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 08:47 IST2025-04-14T08:46:06+5:302025-04-14T08:47:36+5:30
१० तास चाललेल्या या मोजणी प्रक्रियेत ४०१ जण मोजणी करत होते. जेव्हा दानपेटी उघडण्यात आली तेव्हा त्यातील पैसा २८ पोत्यात भरण्यात आला.

४०१ जणांनी १० तास केली मोजणी; बांगलादेशातील 'या' मशिदीला भरभरून दान, फक्त २४ तासांत...
बांगलादेशच्या किशोरगंज जिल्ह्यातील ऐतिहासिक पगला मशिदीत एका दिवसात रेकॉर्डब्रेक दान मिळालं आहे. शनिवारी मशिदीतील दान पेटीतील रक्कम दिवसभर मोजण्यात आली जेव्हा मोजणी पूर्ण झाली तेव्हा त्यात एकूण ९.१८ कोटी रुपये जमा झाले होते. ही रक्कम आतापर्यंतच्या इतिहासात मशिदीला एकाच दिवसात मिळालेल्या दानापैकी सर्वाधिक आहे. भारतात तामिळनाडूतील मंदिरात जसं दान मिळते तसेच पगला मशिदीत लोकांची आस्था मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात दान मिळालं आहे.
याआधी बांगलादेशात सर्वाधिक दान याच मशिदीत जवळपास ८.२१ कोटी जमा झाले होते. ३० नोव्हेंबर २०२४ मध्ये ही मोजणी करण्यात आली होती. एका रिपोर्टनुसार, मोजणीनंतर सर्व पैसा रूपाली बँकेच्या किशोरगंज शाखेत जमा करण्यात आला. दानपेटीत परदेशी मुद्रा आणि सोने, इतर दागिने जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षित ठेवण्यात आले.
१० तास मोजणी सुरू
किशोरगंजचे उप आयुक्त आणि पगला मस्जिद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फौजिया खान यांनी सांगितले की, सकाळी ७ वाजल्यापासून मशिदीतील दान पेटीतील रक्कमेची मोजणी सुरू होती. ती संध्याकाळी ५ च्या सुमारास पूर्ण झाली. १० तास चाललेल्या या मोजणी प्रक्रियेत ४०१ जण मोजणी करत होते. जेव्हा दानपेटी उघडण्यात आली तेव्हा त्यातील पैसा २८ पोत्यात भरण्यात आला. त्यात खूप मोठ्या प्रमाणात परदेशी चलन आणि सोन्याचे दागिने यांचाही समावेश होता.
इतक्या दानाचे काय करणार?
नदी किनारी असलेल्या या मशिदीत नेहमीप्रमाणे सर्वात जास्त दान मिळते. दर ३ ते ४ महिन्यांनी दानपेटी उघडली जाते. या पैशातून पगला मस्जिद आणि इस्लामिक कॉम्प्लेक्सचा खर्च केला जातो. बाकी पैसा बँकेत जमा केला जातो. या फंडातून जिल्ह्यातील इतर दुसऱ्या मस्जिद, मदरसा, अनाथालय यासह वंचित आणि गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या लोकांची मदत केली जाते.