४० हजार दहशतवादी पाकमध्येच; इम्रान खान यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:24 IST2019-07-25T04:10:57+5:302019-07-25T06:24:28+5:30
आधीच्या सरकारांनी वस्तुस्थिती लपवली

४० हजार दहशतवादी पाकमध्येच; इम्रान खान यांची कबुली
वॉशिंग्टन : अफगाणिस्तान, काश्मीरमध्ये घातपाती कारवाया केलेले सुमारे ३० ते ४० हजार प्रशिक्षित दहशतवादी अजूनही पाकिस्तानमध्येच आहेत, अशी कबुली त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. आमच्या देशात ४० दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. याबद्दल गेल्या १५ वर्षांमध्ये पाकिस्तानातील सरकारांनी अमेरिकेला खरी माहिती दिलीच नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांनी दिलेल्या या माहितीमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे, तसेच भारताची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी भक्कम झाली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे भारताने वेळोवेळी सबळ पुराव्यांनिशी उघड केले होते. अमेरिकी काँग्रेसमधील पाकिस्तानविषयक गटाच्या अध्यक्ष शैला जॅक्सन ली यांनी मंगळवारी आयोजित एका समारंभात इम्रान खान बोलत होते. शैला या अमेरिकन काँग्रेसमधील भारत व भारतीय अमेरिकनविषयक गटांच्याही सदस्य आहेत. अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. दहशतवाद्यांच्या विरोधात आणखी जोरदार कारवाई करण्याची अपेक्षा अमेरिका ज्या वेळेस करीत होती त्याचवेळी पाकिस्तान अस्तित्व टिकविण्यासाठी झगडत होता.
अफगाणिस्तानातील स्थिती अत्यंत बिकट आहे. त्या देशातील स्थिती सुधारावी, अशी पाकिस्तानचीही इच्छा आहे. अमेरिकेची तालिबानींबरोबर सुरू असलेली बोलणी यशस्वी व्हावी, यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती ट्रम्प यांना दिल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.