समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:22 IST2026-04-09T17:22:01+5:302026-04-09T17:22:49+5:30
300 Year Old Shipwreck India to Portugal: ३०० वर्षांपूर्वीचे खजिन्याचे जहाज सापडले, भारतातून पोर्तुगालला जात असताना झालेली लूट!

समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
समुद्राच्या अथांग गर्भात शेकडो वर्षांपासून दडलेली रहस्ये आता उलगडू लागली आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनी अशा एका जहाजाचा ढिगारा शोधून काढला आहे, जे ३०० वर्षांपूर्वी भारतातून अब्जावधींचा खजिना घेऊन पोर्तुगालकडे निघाले होते. 'नोसा सेन्होरा दो काबो' असे या जहाजाचे नाव असून, समुद्री चाच्यांच्या हल्ल्यात ते मादागास्करजवळ बुडाले होते.
हे जहाज १७२१ मध्ये तेव्हाची पोर्तुगीज वसाहत असलेल्या गोव्याहून लिस्बनसाठी निघाले होते. या जहाजावर सोन्या-चांदीच्या विटा, हिरे-मोती, मौल्यवान रत्ने, रेशमी कापड आणि धार्मिक कलाकृतींचा मोठा साठा होता. आजच्या बाजारभावानुसार या खजिन्याची किंमत तब्बल १३८ दशलक्ष डॉलर्स सुमारे १,१५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
समुद्री चाच्यांचा थरार
८ एप्रिल १७२१ रोजी हिंद महासागरातील 'रियुनियन बेटा'जवळ हे ७०० टनी जहाज नांगरून उभे असताना 'ओलिव्हियर लेव्हासूर' आणि 'जॉन टेलर' या कुख्यात समुद्री चाच्यांनी त्यावर हल्ला केला. चाच्यांनी या जहाजाला आपल्या अड्ड्यावर नेले आणि तिथे प्रचंड लूट केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी शेवटी हे जहाज समुद्रात बुडवून दिले.
मलब्यात काय सापडले?
पुरातत्वशास्त्रज्ञांना या जहाजाच्या अवशेषातून आतापर्यंत ३,३०० हून अधिक वस्तू सापडल्या आहेत. यात सोन्याची नाणी, चिनी मातीची भांडी आणि काही दुर्मिळ मूर्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अजूनही या मलब्यात मोठा खजिना दडलेला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे, कारण जहाजाचा बराचसा भाग अजूनही वाळूखाली गाडला गेला आहे.
सेंटर फॉर हिस्टोरिक शिपव्रेक प्रिजर्वेशनच्या संशोधकांनी मादागास्करजवळील नोसी बोराहा बेटाजवळ हा शोध लावला असून, या ऐतिहासिक खुणांमधून १८ व्या शतकातील समुद्री व्यापाराची आणि लुटालुटीची नवीन माहिती समोर येत आहे.