300 militants killed in Balakot airstrike, former Pakistani official finally confesses | बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये मारले गेले ३०० दहशतवादी, पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याने अखेर दिली कबुली

बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये मारले गेले ३०० दहशतवादी, पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याने अखेर दिली कबुली

ठळक मुद्देपाकिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितला बालाकोटमध्ये मारल्या गेलेल्यांचा खरा आकडा भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले होतेपाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये दिली कबुली

इस्लामाबाद - पुलवामा येथे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हवाई हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे आकडे समोर येत होत होते. त्यातच भारताच्या हल्ल्यात एकही नागरिक मारला गेला नसल्याचे सांगत पाकिस्तानने कांगावा केला होता. दरम्यान, या हल्ल्याला दोन वर्षे उलटत असतानाच पाकिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याने बालाकोटमध्ये मारल्या गेलेल्यांचा खरा आकडा सांगितले आहे.

भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले होते, अशी कबुली पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये २६ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या एअरस्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेल्याचे मान्य केले.

आगा हिलाली हे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत नेहमीच भाग घेत असतात. तसेच पाकिस्तानी सैन्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलाच्या पराक्रमामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्करावर ओढवलेल्या नामुष्कीची कबुली दिली आहे.
खैबर पख्तुनख्या प्रांतातील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ आहे. भारतीय हवाई दलाने या तळाला लक्ष्य केले होते. मात्र त्यावेळी आपली फजिती लपवण्यासाठी पाकिस्तानने या तळावर कुणी उपस्थित नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर भारतातही अनेकांनी या एअरस्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्याबाबत शंका उपस्थित केली होती.
आगा हिलाली पुढे म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे झेपावत युद्धसदृश कारवाई केली होती. यामध्ये किमान ३०० जण मारले गेल्याचे वृत्त होते. मात्र आमचे लक्ष्य वेगळे आहे. आम्ही त्यांच्या हायकमांडना लक्ष्य करतो. तेच आमचे अचूक लक्ष्य आहे. तेव्हा आम्ही सांगितले होते की, सर्जिकल स्ट्राइकमध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. आता आम्ही सांगितले की, ते जे काही करतील त्याला आम्हीसुद्धा त्याच स्तरावर उत्तर देऊ.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 300 militants killed in Balakot airstrike, former Pakistani official finally confesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.