२७ देश ट्रम्पविरोधात बंडाच्या तयारीत; व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 08:49 IST2025-04-08T08:48:26+5:302025-04-08T08:49:02+5:30
अमेरिकेची २८ अब्ज डॉलरची निर्यात अनिश्चिततेच्या छायेखाली आली आहे.

२७ देश ट्रम्पविरोधात बंडाच्या तयारीत; व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता
नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या समतुल्य आयात कराला (रिसिप्रोकल टॅरिफ) उत्तर म्हणून २७ देशांचा युरोपीय संघही (ईयू) आता अमेरिकी वस्तूंवर आयात कर लावण्याच्या तयारीत आहे. यामुळे अमेरिकेची २८ अब्ज डॉलरची निर्यात अनिश्चिततेच्या छायेखाली आली आहे.
अमेरिकेच्या आयात करास उत्तर म्हणून चीनने अमेरिकी वस्तूंवर आधीच ३४ टक्के अतिरिक्त कर लावला आहे. कॅनडानेही प्रतिकारवाई करीत अमेरिकी वस्तूंवर २५ टक्के कर लावला आहे. त्यामुळे सोमवारी जगभरातील बाजारांनी आपटी खाल्ली आहे. त्यातच ईयूच्या संभाव्य कारवाईचे वृत्त आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतून आयात होणाऱ्या डेंटल फ्लॉसपासून हिऱ्यापर्यंतच्या अनेक वस्तूंवर ईयूकडून अतिरिक्त कर लावला जाऊ शकतो. याच्या पहिल्या संचास मंजुरी देण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकेच्या कोणत्या वस्तूंवर प्रत्युत्तरादाखल कर लावायचे याचा निर्णय युरोपीय कमिशन घेत आहे. यात मांस, अन्नधान्ये, मद्य, लाकूड, कपडे, च्युइंग गम, डेंटल फ्लॉस, व्हॅक्युम क्लिनर आणि टॉयलेट पेपर यांचा समावेश केला जाऊ शकतो. सर्वाधिक चर्चेतील बोरबॉनही संभाव्य कराच्या यादीत असल्याची माहिती आहे.
५० टक्के टॅरिफ निश्चित?
युरोपीय कमिशनने अमेरिकी वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ निश्चित केल्याची माहिती आहे. मात्र, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय संघास या मुद्यावरून धमकावले आहे. युरोपीय संघाने टॅरिफ लावल्यास संघाच्या अल्कोहोलिक ड्रिंकवर २०० टक्के काउंटर टॅरिफ लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
युरोपियन वस्तूंसाठी मोठी बाजारपेठ
युरोपियन युनियन ही अमेरिकेचे सर्वात महत्त्वाच्या व्यापार भागीदारांपैकी एक आहे. अमेरिका ही युरोपियन वस्तूंसाठी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या टॅरिफला प्रत्युत्तर देणे हे एक वेदनादायक कार्य ठरू शकते. तसेच युरोपियन कंपन्यांसाठी खर्चिक ठरु शकते. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून नेमक्या उत्पादनांवर किती आकारण्यात यावा यावर विचार केला जाणार आहे. सदस्य देशांकडून याबाबत अभिप्राय मागवले जाणार आहेत. त्यानंतरच उत्पादनांची यादी निश्चित केली जाणार आहे.
‘टॅरिफ म्हणजे एक औषध; कडू घोट घ्यावेच लागणार’
वॉशिंग्टन : आम्ही लावलेला समतूल्य आयात कर हे एक कडू औषध असून त्याचा कडू घोट घ्यावाच लागणार आहे, अशा शब्दांत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात कराचे समर्थन केले आहे. अमेरिकेचे कर हटविण्यासाठी विदेशी सरकारांना मोठी किंमत मोजावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. टॅरिफबाबत चर्चा करण्यासाठी जगभरातील ५० देशांनी अमेरिकन प्रशासनाला आतापर्यंत संपर्क केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
नेत्यांची सवलतीसाठी विनंती
‘एअर फोर्स वन’मध्ये ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार कोसळल्याच्या वृत्तावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ट्रम्प म्हणाले की, काहीही खाली यावे, कोसळावे ही माझी इच्छा नाही. मात्र, काही तरी ठीक करण्यासाठी औषध घ्यावे लागते. औषधाचे कडू घोटही प्यावेच लागतील. सप्ताहाखेर मी युरोप व आशियाई नेत्यांशी चर्चा केली. हे नेते टॅरिफमध्ये सवलत देण्याची विनंती करीत आहेत.