पाकिस्तानची मदत करणाऱ्या चीनमध्ये शक्तीशाली स्फोट; १७ जण जखमी, इमारतींसह वाहनांचे मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:37 IST2025-04-30T16:33:30+5:302025-04-30T16:37:18+5:30
चीनमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पाकिस्तानची मदत करणाऱ्या चीनमध्ये शक्तीशाली स्फोट; १७ जण जखमी, इमारतींसह वाहनांचे मोठं नुकसान
China Blast: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेले असताना पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनमध्ये एक मोठा विनाशकारी स्फोट झाला. या भयानक स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा अद्याप कळलेला नसला तरी, सुमारे दीड ते दोन डझन लोक या स्फोटात जखमी झाले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, बुधवारी चीनच्या शांक्सी प्रांतातील एका निवासी संकुलात हा स्फोट झाला. हा हल्ला कोणी केला आणि कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
चीनच्या शांक्सी प्रांतातील एका निवासी भागात बुधवारी झालेल्या स्फोटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, तैयुआनच्या झियाओडियन जिल्ह्यातील एका निवासी इमारतीजवळ हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
निवासी संकुलात झालेल्या स्फोटात १७ जण जखमी झाले, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिया ओडियन जिल्ह्यातील बेयिंग परिसरात दुपारी १ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. यामध्ये १७ जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. स्फोटामुळे लागलेली आग दुपारी ३ वाजेपर्यंत आटोक्यात आली. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी बचाव पथके बाधित इमारतीत घरोघरी जाऊन सुरक्षा तपासणी करत आहेत.
या स्फोटाच्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये स्फोटाची तीव्रता दिसून येत आहे. स्फोटामुळे इमारतीखाली असलेल्या गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत. तर इमारतीमधील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे.
दरम्यान, २६ एप्रिल रोजी इराणमधील सर्वात मोठ्या शाहिद राजाई बंदरावर एक भीषण स्फोट झाला होता. ज्यामध्ये ४० हून अधिक लोक ठार झाले तर सुमारे १२०० लोक जखमी झाले. चीनमधून आयात केलेल्या क्षेपणास्त्र इंधनामुळे हा स्फोट झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर आता चीनमध्येच स्फोट झाल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.