भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:33 IST2025-10-27T09:33:14+5:302025-10-27T09:33:48+5:30
Ram Mandir News: या छोट्या देशात हिंदू लोकसंख्या कमी असली तरी, येथील लोकांच्या मनात हिंदू चालीरीती आणि परंपरा अजूनही खोलवर रुजलेल्या आहेत, असे म्हटले जात आहे.

भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
Ram Mandir News: २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. यानंतर आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी अयोध्येत जाऊन रामललांचे दर्शन घेतले. भारतातून नाही, तर परदेशातून अयोध्येत येणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. यातच भारतापासून १४ हजार किमी दूर असलेल्या आणि केवळ १४ लाख लोकसंख्या असलेल्या एका छोट्या देशाने भव्य राम मंदिर बांधण्याचा निर्णय घोषित केला आहे.
या देशाचे नाव त्रिनिदाद आणि टोबॅगो आहे. या ठिकाणी सुमारे साडे तीन लाख हिंदू लोकसंख्या आहे. हे कॅरिबियन राष्ट्र हिंदू धर्माचे एक प्रमुख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून स्वतःला स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. एका वृत्तानुसार, मंत्री बॅरी पदारथ यांनी जाहीर केले की, राम मंदिराबाबत नेत्यांशी चर्चा झाली आहे. सरकार त्याच्या बाजूने आहे. या वर्षी अयोध्येतून रामलला मूर्तीची प्रतिकृती आणण्यास मदत करणाऱ्यांशीही सरकारने चर्चा केली आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो, या देशाला रामायण देश म्हणून संबोधले जाते. ते भारताबाहेर हिंदू परंपरा जपण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे.
देशात धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल
मंत्री पदारथ म्हणाले की, १९ व्या शतकापासून हिंदू परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. येथील घरांमध्ये आजही भगवद्गीता आणि रामायण भक्तीने वाचले जाते. राम मंदिर प्रकल्पामुळे देशात धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. भगवान रामाचे आदर्श प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकारने दिवाळीच्या वेळी ही घोषणा केली. सरकार पुढील काही महिन्यांत राम मंदिर प्रकल्पासाठी संपूर्ण ब्लूप्रिंट सादर करेल.
अयोध्या नगरी स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला
मंदिर प्रकल्प पुढे नेण्यासाठी सरकारी अधिकारी सक्रियपणे काम करत आहेत, असे मंत्र्यांनी सांगितले. न्यू यॉर्कमधील ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ द राम मंदिरचे संस्थापक प्रेम भंडारी यांनी येथे अयोध्या नगरी स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. उत्तर अमेरिकेतील हिंदू भक्तांसाठी, विशेषतः जे भगवान रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे एक प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असेल. भंडारी यांनी हा प्रस्ताव त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांना सादर केला, जे स्वतः भारतीय वंशाचे नेते आहेत.
दरम्यान, मे २०२५ मध्ये अयोध्या राम मंदिरातून प्रति रामलला सारखे दिसणारे एक मूर्ती आणण्यात आले, तेव्हा या उपक्रमाला गती मिळाली. त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील अयोध्या श्री राम संघटनेचे अध्यक्ष प्रेम भंडारी आणि अमित अलाघ यांनी या समारंभाचे आयोजन केले. हजारो भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी जमले होते. एका आकडेवारीनुसार, १० हजार भाविकांनी राम मंदिराचे दर्शन घेतले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये हिंदू लोकसंख्या कमी असली तरी, येथील लोकांच्या मनात हिंदू चालीरीती आणि परंपरा अजूनही खोलवर रुजलेल्या आहेत.