"आमच्याकडे १३० अणुबॉम्ब, सजवून ठेवण्यासाठी नाहीत"; पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:41 IST2025-04-27T14:34:28+5:302025-04-27T14:41:31+5:30

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कृतीनंतर पाकिस्तानी मंत्र्यांनी धमकी दिली आहे.

130 nuclear bombs are ready all of them are for India Pakistani Railway Minister threat | "आमच्याकडे १३० अणुबॉम्ब, सजवून ठेवण्यासाठी नाहीत"; पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी

"आमच्याकडे १३० अणुबॉम्ब, सजवून ठेवण्यासाठी नाहीत"; पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी

Pahelgam Attack Pakistan Railway Minister: पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून २६ जणांची हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला आहे. पाकिस्तानातील राजकीय नेत्यांकडून भारताला धमकावण्याचे प्रयत्न सुरु झालेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांनी सिंधू नदीतून आमचं पाणी वाहील किंवा त्यांचं रक्त वाहील, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी गरळ ओकली आहे.

 पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताने घेतलेल्या निर्णयांनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एका पाकिस्तानी मंत्र्यांने भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री हनीफ अब्बासी यांनी पाकिस्तानची घौरी, शाहीन आणि गझनवी क्षेपणास्त्रे आणि १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी ठेवली आहेत, असं म्हटलं. जर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचे धाडस केले तर युद्धासाठी तयार राहण्याची धमकीही अब्बासी यांनी दिली.

रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना अब्बासी यांनी भारताला धमकावले. "जर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आमची सर्व क्षेपणास्त्रे भारताच्या दिशेने आहेत. जर भारताने कोणतीही कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. राजनैतिक प्रयत्नांसोबतच, आम्ही सीमांच्या सुरक्षेसाठीही व्यवस्था केल्या आहेत. पहलगाम हल्ला हे फक्त एक निमित्त आहे. सिंधू पाणी कराराकडेही लक्ष दिले जात आहे," असे हनीफ अब्बासी म्हणाले.

"आम्ही  गौरी, शाहीन, गझनवी ही क्षेपणास्त्रे चौकात सजावटीसाठी ठेवली नाहीत. आम्ही ती भारतासाठी ठेवली आहेत. आमच्याकडे असलेली १३० अण्वस्त्रे आम्ही फक्त मॉडेल बनवण्यासाठी ठेवली नाहीत आणि पाकिस्तानच्या कोणत्या भागात ठेवली आहेत हे तुम्हाला माहितीही नाही.तुम्ही असा विचारही करू नका की तुम्ही पाकिस्तानची सीमा ओलांडाल. जर तुम्ही याचा विचार केलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील," असेही अब्बासी यांनी म्हटलं.
 
याआधी सिंध प्रांतातील सुक्कुर येथे एका जाहीर सभेत बिलावल भुट्टो-झरदारी यांनी भारताला इशारा दिला होता. "आम्ही कोणालाही सिंधू नदीचा सौदा करू देणार नाही. आपला कमकुवतपणा लपवण्यासाठी आणि जनतेला मूर्ख बनवण्यासाठी, मोदी सरकार पाकिस्तानवर खोटे आरोप करून सिंधू पाणी करार एकतर्फी स्थगित करत आहे. पण मला सुक्कुरमध्ये सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला स्पष्ट संदेश द्यायचा आहे की सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर या नदीतून आमचं पाणी त्यातून वाहील किंवा त्यांचं रक्त वाहील," असे भुट्टो यांनी म्हटलं.

Web Title: 130 nuclear bombs are ready all of them are for India Pakistani Railway Minister threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.