१0 देशांनी जमिनीवर आणली ‘बोइंग ७३७ मॅक्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 02:00 IST2019-03-13T01:59:59+5:302019-03-13T02:00:21+5:30
इथोपियन एअरलाइन्सचे विमान बोइंग ७३७ (मॅक्स ८००) कोसळल्यानंतर जगातील किमान १0 देशांनी बोइंगची त्या पद्धतीची विमाने जमिनीवर उतरवली.

१0 देशांनी जमिनीवर आणली ‘बोइंग ७३७ मॅक्स’
नवी दिल्ली : इथोपियन एअरलाइन्सचे विमान बोइंग ७३७ (मॅक्स ८००) कोसळल्यानंतर जगातील किमान १0 देशांनी बोइंगची त्या पद्धतीची विमाने जमिनीवर उतरवली. बोइंगच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले तरी स्पाइस जेट, जेट एअरवेज एअरलाइन्स बोइंग विमानाचा वापर सुरूच ठेवणार आहेत.
नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) बोइंगच्या समीक्षेनंतर म्हटले की, काळजीचे कारण नाही. तथापि, डीजीसीएने अतिरिक्त सुरक्षा निर्देश जारी केले आहेत. यात म्हटले की, या विमानांचे उड्डाण करणाऱ्या पायलटकडे किमान १००० तासांच्या उडाणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वीच इथियोपियात ७३७ - मॅक्स विमान कोसळून १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर डीजीसीएने उपाययोजना केली आहे.
स्पाइस जेट या भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कंपनीकडे बोइंगची १३ विमाने आहेत. तर, १५५ विमानांची आॅर्डर दिलेली आहे.
उड्डाणावर प्रतिबंध आणणाºया देशांच्या यादीत आॅस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझिल, चीन, सिंगापूर यांचा समावेश झाला आहे. दक्षिण कोरयातील एका कंपनीनेही बोइंगचे उड्डाण थांबविले.
अमेरिका करणार कारवाई
अमेरिकेच्या विमान वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, बोइंग ७३७ मॅक्स ८ मध्ये सुधारणा करण्यास सांगण्यात येणार आहे. तथापि, अमेरिकेने अद्याप बोइंग विमानांच्या उड्डाणावर प्रतिबंध आणलेले नाहीत.