भारताच्या हॉकी संघाने सुरु असलेल्या आशियाई कप हॉकी टुर्नामेंटमध्ये कझाकिस्तानच्या पार चिंधड्या उडविल्या आहेत. सुपर-४ मध्ये आपली जागा निश्चित करताना भारतीय संघाने एकामागोमाग एक १५ गोल मारले आहेत. तर कझाकिस्तानला एकही गोल करता आलेला नाही.
या विजयाने भारताने अ गटातील अव्वल स्थान गाठले आहे. अभिषेक (५वे, ८वे, २०वे आणि ५९वे मिनिट), सुखजीत सिंग (१५वे, ३२वे, ३८वे), जुगराज सिंग (२४वे, ३१वे, ४७वे), कर्णधार हरमनप्रीत सिंग (२६वे), अमित रोहिदास (२९वे), राजिंदर सिंग (३२वे), संजय सिंग (५४वे), दिलप्रीत सिंग (५५वे) यांनी हे गोल केले.
पहिल्या क्वार्टरमध्ये तीन गोल, दुसऱ्यामध्ये चार गोल करत मध्यार्धापर्यंत सात गोलांची आघाडी मिळविली होती. एकामागोमाग एक गोल होत असल्याने कझाकिस्तानचे मनोबल पुरते ढासळलेले होते. भारतीय संघाने याचा फायदा उर्वरित खेळात घेत आणखी आठ गोल केले. यामुळे अभिषेक, सुखजीत आणि जुगराज या तिघांनीही हॅटट्रीक नोंदविली आहे. या चषकात भारतीय संघाने चीन आणि जपानला देखील नमविले आहे. या स्पर्धेत जिंकणारा संघ बेल्जियम आणि नेदरलँड्स संयुक्तपणे आयोजित होणाऱ्या हॉकी वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार आहे. यामुळे भारतासाठी हा चषक खूप महत्वाचा आहे. पाकिस्तानने आधीच या स्पर्धेतून माघार घेतली आहे.