तौरंगा : अभेद्य बचाव आणि वेगवान आक्रमणाच्या बळावर भारतीय हॉकी संघाने चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या अखेरच्या साखळी लढतीत शनिवारी न्यूझीलंडचा ३-१ ने पराभव केला. भारताला उद्या बेल्जियमविरुद्ध खेळायचे आहे. बेल्जियमने अन्य एका सामन्यात जपानवर ४-१ असा विजय साजरा केला.भारताकडून युवा खेळाडू मनप्रीतसिंग याने दुसºया, दिलप्रीतने १२ व्या आणि मनदीपसिंग याने ४७ व्या मिनिटाला गोल केले. मागच्या सामन्यात भारत बेल्जियमकडून ०-२ ने पराभूत झाला होता. भारताने आज चुकांपासून बोध घेत आक्रमक सुरुवात केली. दुसºयाच मिनिटाला याचा लाभ झाला. मनदीपने संघाला पेनल्टी कॉर्नर मिळवून देताच हरमनप्रीतने त्यावर अचूक गोल नोंदविला. न्यूझीलंडने यानंतर हल्ले चढविले, पण भारताची बचावफळी फारच भक्कम राहिली. भारताचा ज्युनियर खेळाडू दिलप्रीतने गोल केला.४२ व्या मिनिटाला भारताविरुद्ध मिळालेली पेनल्टी कॉर्नरची संधी रसेलने गोलमध्ये रूपांतर करीत साधली. मनदीपने ४७ व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवित आघाडी ३-१ अशी केली. सामन्यानंतर भारतीय कोच मारिन शोर्ड म्हणाले,‘आम्ही आज सुरेख सुरुवात केली. मी संघाच्या कामगिरीवर आनंदी आहे. आम्ही तयारीसह सामन्यात उतरलो होतो. चांगली कामगिरी करण्याची भूक प्रत्येक खेळाडूला होती.’ (वृत्तसंस्था)
हॉकीत भारताचा न्यूझीलंडवर विजय, उद्या बेल्जियमविरुद्ध लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 01:10 IST