पाण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेवर धडकला महिलांचा घागर मोर्चा
By प्रसाद आर्वीकर | Updated: January 3, 2025 17:24 IST2025-01-03T17:24:18+5:302025-01-03T17:24:41+5:30
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात या महिलांनी काही वेळ ठिय्या मांडला.

पाण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेवर धडकला महिलांचा घागर मोर्चा
हिंगोली : पंधरा दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नांदूर येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नांदुरा गावातील अनेक महिला डोक्यावर घागर घेऊन ३ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेत पोहोचल्या. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात या महिलांनी काही वेळ ठिय्या मांडला. नांदुरा येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे; परंतु या योजनेसाठी घेतलेल्या विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असतानाही ग्रामस्थांना मात्र नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. पंधरा दिवसांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला. या प्रकरणी तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चामध्ये महिला घागर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
नांदुरा येथील जिल्हा जीवन योजनेच्या कामांमध्ये गैरप्रकार झाला आहे. विहिरीला मुबलक पाणी असतानाही ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थ यापूर्वी केली होती; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी हा मोर्चा काढण्यात आला.