हिंगोली : राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज कयाधूच्या पात्रातून उपसण्याची आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केलेली मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी उचलून धरत तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे कयाधूच्या खोलीकरणाचा मार्ग आपोआपच मोकळा होणार असल्याचे चित्र आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. या प्रश्नावर जो-तो बोलत आहे. अनेकजण त्यावर कामही करायला पुढाकार घेण्याची तयारी करीत आहेत. त्यातच काही संस्था, संघटनांनीही या प्रश्नात लक्ष घालून नदी पुनर्जीवनासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मात्र रामबाण उपाय काढला आहे. यासाठी त्यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले की, हिंगोली राष्ट्रीय महामार्ग १६१ कनेरगाव नाका ते हिंगोली रिसोड, सेंनगाव या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.या कामाच्या परिसरातून कयाधू नदी वाहते या नदीमध्ये जाड रेती, दगड, मुरूम, मोठ्या प्रमाणात आहे. या गौण खनिजाचे उत्खनन केल्यास रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल. तसेच यामुळे नदीचे पात्र खोल व रुंद होईल. ज्यामुळे नदीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढेल व नदीचे पात्र मोठे होईल तसेच करण्यात येणाऱ्या बंधाºयानंतर खोली आणि रुंदीमुळे पाणी जास्त प्रमाणात साठवल्या जाईल. यामुळे शेतकरी बांधवाना आता कुठल्याही प्रकारचे कष्ट न करता नदीचे पात्र मोठे करता येईल. या संबंधीचे पत्र गडकरी यांना लेखी दिले. त्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन गौण खनिज उत्खनन करू द्यावे, असे म्हटले. तर तुमच्या जिल्ह्यात यापुढे विकासासाठी जो निधी लागेल तो देण्यास तयार आहे, असा विश्वास दिला. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हा सरचिटणीस फुलाजी शिंदे, के. के. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.बंधाºयांना फायदा : लवकर काम व्हावेआ.मुटकुळे यांनी दिलेल्या पत्रानुसार नदीच्या पात्रातून मुरुम व दगडयुक्त रेती काढण्याची परवानगी देण्याची मुभा गडकरी यांनी दिली. त्याला मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली तर आगामी काळात सिंचन अनुशेषातून होणाºया बंधाºयाच्या कामांना त्याचा फायदा होणार आहे. या नदीचे पात्र सेनगाव तालुक्यात उथळ असल्याने या ठिकाणी बॅरेजेस होणार नसल्याची ओरड आहे. जे बंधारे होणार आहेत, त्यावर शेतकरी समाधानी होणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासाठी उत्खनन झाले तर ते अधिक सोयीस्कर होणार आहे.कयाधूचे उत्खनन करून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गौण खनिज वापरले तर उत्खननासाठी येणारा वेगळा खर्च आपोआपच टळणार आहे. लोकवर्गणीची गरज पडणार नाही.
कयाधूचे पात्र होणार खोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:44 IST